‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेपूर्वी सुष्मिताचा हरवला होता पासपोर्ट,

    दिनांक :07-Jun-2019
अभिनेत्री सुष्मिता सेन व ऐश्वर्या राय यांच्यातील शीतयुद्धाबद्दल बी-टाऊनमध्ये आजवर बऱ्याच चर्चा झाल्या. यावर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुष्मिताने ऐश्वर्यासोबत वैर नसल्याचं स्पष्ट केलं. याच मुलाखतीत तिने ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेचा एक किस्सा सांगितला. १९९४ मध्ये सुष्मिताने ‘मिस इंडिया’चा किताब जिंकत ऐश्वर्याला हरवलं होतं आणि त्याच वर्षी ऐश्वर्याने ‘मिस वर्ल्ड’चा तर सुष्मिताने ‘मिस युनिव्हर्स’चा किताब आपल्या नावे केला होता. ‘मिस युनिव्हर्स’च्या स्पर्धेपूर्वी सुष्मिताचा पासपोर्ट हरवला होता आणि त्यामुळे आयोजक स्पर्धेसाठी ऐश्वर्याला पाठवणार होते. ‘मिस युनिव्हर्स’ची स्पर्धा जिंकण्याचं आपलं स्वप्न अपुरंच राहील असं सुष्मिताला वाटतं होतं.
 
 
 
स्पर्धेपूर्वी तुझा पासपोर्ट हरवला होता अशी चर्चा होती, पण त्यावेळी नेमकं काय घडलं होतं असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, ‘पासपोर्ट हरवला नव्हता तर मी तो अनुपमा वर्मा यांना दिला होता. अनुपमा त्यावेळी प्रसिद्ध मॉडेल आणि इव्हेंट कोऑर्डिनेटर होत्या. बांगलादेशमधील एका शोसाठी मी त्यांना माझा पासपोर्ट दिला होता. कारण त्यांना आयडी प्रूफसाठी ते हवं होतं. स्पर्धेला जाण्यापूर्वी मी जेव्हा मिस इंडियाच्या टीमला पासपोर्टविषयी विचारलं तेव्हा त्यांनी आत्मविश्वासाने सांगितलं की काळजी नको करूस, पासपोर्ट अनुपमा यांच्याजवळ आहे. पण अनुपमा जेव्हा पासपोर्ट शोधू लागल्या तेव्हा तो त्यांना सापडत नव्हता. नंतर त्यांनी या निष्काळजीपणाची जबाबदारी स्वीकारली.’
पासपोर्ट हरवल्याने सुष्मिता अत्यंत निराश होती. मिस इंडियाच्या टीमने तिला सांगितलं होतं की तू मिस वर्ल्डच्या स्पर्धेत सहभागी हो आणि ऐश्वर्याला मिस युनिव्हर्ससाठी जाऊ दे. हे ऐकून सुष्मिताच्या अश्रूंचा बांधच फुटला. त्यावेळी सुष्मिताच्या वडिलांनी तेव्हाचे केंद्रीय मंत्री राजेश पायलट यांच्याकडे मदत मागितली. सुष्मिता आपल्या देशाचं प्रतिनिधीत्व करायला जात आहे, त्यामुळे तिला पासपोर्ट मिळवण्यात मदत करावीच लागेल असं त्यांनी म्हटलं होतं. पुढे त्यांच्या मदतीमुळे सुष्मिता ‘मिस युनिव्हर्स’च्या स्पर्धेत  जाऊ शकली आणि तिने तो किताब जिंकला.