शुभसंकेती विजयारंभ!

    दिनांक :07-Jun-2019
‘वेल बिगिन इज हाफ डन’ अशी इंग्रजीत म्हण आहे. त्या अर्थाने, इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेतील विजयारंभ भारतासाठी शुभसंकेत देणारा ठरावा. इंग्लंडच्या साऊदम्पटनमध्ये झालेल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचे आव्हान मोडून काढले. उपकर्णधार रोहित शर्मा याची शतकी खेळी आणि यजुवेंद्र चहल याने टिपलेल्या चार बळींच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेला सहा गडी आणि १५ चेंडू राखून नमविले. आफ्रिकेचा वर्ल्डकप स्पर्धेतील हा सलग तिसरा पराभव ठरला.
 
क्रिकेटच्या सर्वात मोठ्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेचा प्रारंभ 30 मे रोजी झाला आणि समारोप लॉर्डस्‌ मैदानावर 14 जुलैला होणार आहे. त्या अर्थाने येणार्‍या दीड महिन्यात यंदा विश्चषकावर कुणाचे नाव कोरले जाईल, हे निश्चित होणार आहे. ज्याच्या नावावर विजय कोरला जाईल, त्याच्या ताब्यात पुढील चार वर्षे विश्वचषक राहणार आहे. या विश्वचषकासाठी प्रमुख दावेदार असलेल्या संघांमध्ये भारताचाही समावेश आहे. एकूण 10 क्रिकेट चमूंपैकी अर्ध्या म्हणजे पाच चमू आशिया खंडातील आहेत. त्यात भारतासह पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. गेल्या विश्वचषकातही याच पाच चमू खेळत होत्या. पण, त्या वेळी आशियाई चमूंची संख्या पाच असली, तरी एकूण संघांची संख्या 14 होती. पहिला सामना जिंकल्यामुळे भारतीयांच्या आशा पल्लवित होणे स्वाभाविक आहे. पण, अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. एका अर्थी भारतीय खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयामुळे स्फुरण चढले, त्यांचे मनोधैर्य वाढले, एवढाच साधा निष्कर्ष आपण यातून काढायला हवा. 
 
 
इंग्लंड आणि वेल्सने एकत्रित रीत्या विश्वचषक आयोजित करण्याची ही पाचवी वेळ असून, भारताचे नाव संभाव्य विजेत्या देशांमध्ये घेतले जात आहे. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू सचिन तेंडुलकर याला तर भारताबद्दल या स्पर्धेकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या स्पर्धेत भारताने विश्वचषक जिंकलेला पाहण्यास मला आवडेल, असे विधान त्याने आधीच करून टाकले आहे. या स्पर्धेत इंग्लंडमधील 10 शहरांतील 11 मैदानांवर एकूण 48 सामने होणार आहेत. 2015 च्या विश्र्वचषकानंतर प्रत्येक टीमच्या जय-पराजयाचा आलेख जाहीर झालेला आहे. त्या आलेखावर एकवार नजर टाकली असता, त्यात इंग्लंडची चमू पहिल्या क्रमांकावर आहे. या संघाच्या जय-पराजयाची सरासरी 2.51 आहे. याचा अर्थ सरासरी 2.51 सामने जिंकल्यानंतर हा संघ एका सामन्यात हरतो. यंदा इंग्लंडचा संघ विश्वचषकाचा मजबूत दावेदार आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेची सरासरी 1.65 आहे. हा संघ तिसर्‍या स्थानावर आहे. क्रमांक दोनवर भारतीय संघ असून, या संघाची विजयाची सरासरी 1.81 आहे.
 
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज हे पाच देश गैरआशियाई म्हणून या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. यात गतविजेता ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघाचा समावेश आहे. प्रचंड चुरस असलेल्या या स्पर्धेतील विजयासाठी सार्‍यांनीच कंबर कसली असली, तरी इंग्लंड आणि भारताकडे संभाव्य विजेते म्हणून बघितले जात आहे. जाणकारही यास दुजोरा देत आहेत. भारताचा फिरकीरपटू रविचंद्रन अश्र्विन यानेही यास दुजोरा दिला आहे. त्याच्या मते भारत अंतिम फेरी गाठेल.
 
क्रिकेटच्या सर्वात मोठ्या प्रकारात एकूण 70 कोटी रुपयांची पारितोषिके आहेत. यातील विजेत्या संघाला 28 कोटी रुपये दिले जातील, जे गेल्या विश्र्वचषकापेक्षा 8 टक्के अधिक आहेत. 2015 मधील विजेत्या ऑस्ट्रेलियाला पारितोषिकादाखल 26 कोटी रुपये मिळाले होते.
 
यंदाच्या खेळाची ध्यानात घेण्याची बाब म्हणजे, ज्या इंग्लंडने 142 वर्षांपूर्वी जगाला क्रिकेटचा खेळ दिला, त्या देशात यंदा 20 वर्षांनी विश्र्वचषक परतला आहे. यापूर्वी 1999 मध्ये इंग्लंडला यजमानपद मिळाले होते. इंग्लंडने सर्वाधिक एकूण पाच वेळा विश्र्वचषकाचे आयोजन केले आहे. पहिली अधिकृत कसोटी 1877 मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवली गेली.
 
भारतीय संघ हा यंदाच्या विश्र्वचषकात सर्वांचा आवडता संघ असल्याची आकडेवारी सांगते. भारताची फलंदाजी भक्कम असून रोहित शर्मा, शिखर धवन आणि विराट कोहली हे पहिले 3 खेळाडू अतिशय फॉर्मात आहेत. त्यांची गेल्या काही महिन्यांची कामगिरी अप्रतिम म्हणून नोंदली गेली. रोहित आणि विराट यांनी तर आपण विश्र्वातील सर्वोत्तम फलंदाज आहोत, हे त्यांच्या खेळातून दाखवून दिले आहे. विराटचा खेळदेखील परिपक्व आहे. तो डावाला उत्तम गती मिळवून देतो. त्याला रोहित शर्माच्या फटकेबाजीची जोड मिळाली तर भारतीय संघाला कुणीही रोखू शकत नाही, असेही मत रविचंद्रन अश्विन याने नोंदविले आहे.
 
अनेकांना इंग्लंड आणि भारताचा अंतिम सामना रंगेल, असे वाटत आहे. सार्‍या जगाचे लक्ष लागलेल्या या खेळात भारताचा परंपरागत शत्रू म्हणून पाकिस्तानी संघाकडे पाहिले जाते. पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 42 सीआरपीएफ जवानांच्या मृत्यूनंतर भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेटचे सामने न खेळण्याची भूमिका घेतली होती. पण, दुबईत क्रिकेटच्या भीष्माचार्यांच्या झालेल्या बैठकीत भारत विरुद्ध पाकिस्तान सामने पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार होतील, असे ठरले. भारतही खेळात अतिराजकारण नको, पाकिस्तानला बालाकोटमध्ये घुसून मारल्यामुळे त्याला धडा मिळाला आहे, अशी भूमिका घेत पाकिस्तानसोबत सामने खेळण्यास राजी झाला. त्यामुळे भारत-पाकिस्तान सामन्यात कुणाचा विजय होतो, याची उत्कंठा क्रीडारसिकांना लागली आहे. या प्रतिस्पर्ध्यांच्या मॅचसाठी जगभरातील रसिकांनी विमानाची, हॉटेल्सची आणि सामन्यांची तिकिटे बूक करून ठेवली आहेत. काळ्या बाजारात या सामन्याची तिकिटे लाखाहून अधिक किमतीला विकली जात असल्याचा खुलासा झाला आहे. यावरून भारत-पाक सामना किती लक्ष्यवेधी ठरेल आहे, हे स्पष्ट होते.
 
भारतीय समाज जगभर पसरलेला आहे आणि त्यांची क्रयशक्तीदेखील वाढली आहे. इंग्लंडमधील भारतीयांचा क्रिकेटचा उत्साह किती असावा, याचा अंदाज लावता येईल का? कदाचित नाही लावता येणार. पण, भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यासाठी अक्षरश: भारतीय चाहत्यांनीच 90 टक्के स्टेडियम तुडूंब भरले होते. साऊदम्पटन रेल्वेस्थानक हे मुंबईतील चर्चगेट स्थानकाप्रमाणे वाटत होते, असे वार्तांकन एका पत्रकाराने केले आहे. लीड्स, लंडन, ब्रिस्टल या ठिकाणांहून येणार्‍या रेल्वेतून फक्त भारतीय चाहतेच बाहेर पडत होते. यातील जवळपास प्रत्येकानेच निळा टी-शर्ट आणि हातात तिरंगी झेंडा घेतला होता. मराठी चाहते तर सचिन तेंडुलकरचा छाप असलेले टी शर्ट घालून व हाती भगवे झेंडे घेऊन स्टेडियममध्ये दाखल झाले होते. ‘जितेगा भाई जितेगा, हमारा इंडिया जितेगा’ तसेच ‘बूम बूम बुमरा...’ यांसारख्या घोषणांनी स्टेडियम दणाणून गेले होते. त्यामुळे भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळविलेल्या विजयात भारतीय पाठीराख्यांचा वाटा नाकारता येणार नाही. भारताची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणही अव्वल दर्जाचे ठरले आहे. सर्व खेळाडूंचा मेळ झाला आणि विजयाची योजना योग्य रीत्या आखली गेली, तर भारत यशाच्या अखेरच्या पायरीपर्यंत धडक मारल्याशिवाय राहायचा नाही!