'तुला पाहते रे' घेणार प्रेक्षकांचा निरोप?

    दिनांक :07-Jun-2019
मुंबई:
अभिनेता सुबोध भावेची 'तुला पाहते रे' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. गेल्या काही दिवसांत या मालिकेमध्ये नवनवीन वळणं आली. प्रेक्षकांची पसंती मिळवणारी ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं कळतं. जून अखेरपर्यंत मालिकेचं कथानक पूर्ण होणार असल्याचं समजतंय.
 
 
या मालिकेच्या संपूर्ण कथानकाची बांधणी आणि कालावधी पूर्वनियोजित असल्याचं सुबोधनं यापूर्वीच आपल्या मुलाखतीतून सांगितलं होतं. त्यामुळे कथानकात पाणी घालून 'पालीची मगर' करण्याचा प्रकार या मालिकेबाबत होणार नाही असं बोललं जात होतं. मालिकेमध्ये विक्रांतच्या पहिल्या बायकोची, म्हणजेच राजनंदिनीची एंट्री झाल्यापासून, पुढे काय होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. टीआरपीच्या स्पर्धेत 'तुला पाहते रे' नेहमी पुढे असल्याचं पाहायला मिळत होतं. इशाला पडलेलं स्वप्न खरं की खोटं, याचा उलगडा होत असताना आता इशाच राजनंदिनीचा पुनर्जन्म असल्याचं दिसतंय. इशा हीच राजनंदिनी असल्याचं आता स्वत: इशालाही कळलं असून, तिचं एक वेगळं रूप प्रेक्षकांना पाहायला मिळतंय.
इशा हीच राजनंदिनी आहे हे विक्रांतला केव्हा कळणार आणि विक्रांतनं मांडलेला डाव कसा फिसकटणार, याची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. मालिकेच्या शेवटी विक्रांतला त्यानं केलेल्या कृत्यांचा पश्चात्ताप होईल का? इशा विक्रांतने केलेल्या कृत्याचा बदला घेईल का? या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील असं दिसतंय.