काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे २५आमदार भाजपाच्या संपर्कात !

    दिनांक :08-Jun-2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर याचीच पुनरावृत्ती विधानसभेतही पाहायला मिळणार सध्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे, कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे किमान २५ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केला. गिरीश महाजन यांचे वक्तव्य खरे ठरल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादीला याचा मोठा झटका बसू शकतो. 
 

 
 
गिरीश महाजन म्हणाले की, 'काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किमान २५ आमदार माझ्या संपर्कात आहेत. त्यापैकी काही मला एकतर प्रत्यक्ष भेटले आहेत किंवा दूरध्वनीवरून संभाषण केले आहे किंवा त्रयस्थामार्फत ते भाजपमध्ये येण्यास उत्सुक असल्याचा निरोप दिला आहे.' महाजन यांच्यावर शुक्रवारी नाशिकव्यतिरिक्त जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ते म्हणाले, 'काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना ठाऊकही नाही की त्यांच्याभोवती असणारेच लवकरच भाजपच्या वाटेवर चालणार आहेत. राजकीय परिस्थिती भाजपच्या बाजुची आहे. आघाडीला विधानसभेत ५० पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत.' काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील पावसाळी अधिवेशनापूर्वी भाजपप्रवेश करतील असेही महाजन यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: काँग्रेस आमदारांना फोन करून फोडाफोडीचे राजकरण करत असल्याच्या काँग्रेसच्या आरोपाचे त्यांनी खंडन केले आहे.