अनंतनागमध्ये चकमक; लष्कराकडून एका दहशतवाद्याचा खात्मा

    दिनांक :08-Jun-2019
तभा ऑनलाईन टीम 
श्रीनगर,
काश्मीर खोऱ्यात सक्रीय असलेल्या दहशतवाद्यांविरोधातील मोहीम लष्कराने पुन्हा एकदा तीव्र केली आहे. आज सकाळी अनंतनाग जिल्ह्यातील नौगाम शाहबाग लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकीला सुरुवात झाली असून, या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले आहे. 

 
ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्याचा मृतदेह अद्याप ताब्यात आलेला नाही. मात्र मृत दहशतवाद्याचे नाव मोहम्मद इक्बाल असल्याचे समोर आले आहे. तो जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होता. सध्या दोन्ही बाजूनी गोळीबार सुरू असून, दहशतवादी लपून बसल्याची शक्यता गृहित धरून सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकांनी परिसराला घेराव घातला आहे.
दरम्यान, पुलवामा जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी पहाटे सुरू झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. त्यानंतर या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत सुरक्षा दलांनी १०० हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.