#ICCWorldCup2019 : ग्लोव्हज विवादावर बीसीसीआयने उचलले 'हे' पाऊल

    दिनांक :08-Jun-2019
लंडन,
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) भूमिकेनंतर महेंद्रसिंग धोनीच्या ग्लोव्हजवरून सुरू वाद मिटेल अशी शक्यता होती. पण, त्यात आणखी भर पडण्याची चिन्हे दिसत आहेत. बलिदान बॅजचे चिन्ह असलेल्या ग्लोव्हजवर आक्षेप घेत आयसीसीनं नियमांचे काटेकोर पालन झालेच पाहिजे असा आदेश दिला. त्यानुसार धोनीला पुढील सामन्यांत 'बलिदान बॅज'चे चिन्ह असलेले ग्लोव्हज घालता येणार नाही. धोनीने आयसीसीच्या कोणत्याही नियमांचं उल्लंघन केलेले नाही, असा पवित्रा घेणाऱ्या बीसीसीआयने आता एक पाऊल मागे जाण्याचा निर्णय घेतला आहे.

 
 
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात धोनीने हे ग्लोव्हज घातले होते. सामन्यातील भारताने विजय मिळवला, परंतु त्याहीपेक्षा या ग्लोव्हजचीच चर्चा अधिक रंगली. धोनीला हे ग्लोव्हज घालण्याची परवानगी मिळावी याकरिता बीसीसीआयनं आंतरराष्ट्रीय परिषदेला पत्र पाठवले. धोनीच्या ग्लोव्हजवरील चिन्हामुळे आयसीसीच्या कोणतेही नियम मोडले जात नसल्याचा बचाव बीसीसीआयने केला. पण, आयसीसीने शुक्रवारी बीसीसीआयची ही विनंती फेटाळली. धोनीच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्काच होता. नियमांचे उल्लंघन होणार असेल तर हे ग्लोव्हज मी वापरणार नाही, असे धोनीने स्पष्ट केले आहे.
 
 
ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या पुढील लढतीत आपण हे ग्लोव्हज वापरणार नसल्याचे धोनीने सांगितले आहे. अशा प्रकारचे ग्लोव्हज वापरल्याने आयसीसीच्या नियमावलीतील नियमांचा भंग होत असेल तर विश्वचषकात हे ग्लोव्हज मी वापरणार नाही, असे धोनीने बीसीसीआयला सांगितले आहे, असे एका संकेतस्थळाने आपल्या वृत्तात म्हटले आहे. बीसीसीआयनंही एक पाऊल मागे घेताना आयसीसीचे आदेश पाळले जातील हे स्पष्ट केले. प्रशासकिय समितीचे प्रमुख विनोद राज म्हणाले,''आयसीसीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याची आमची ठाम भूमिका आहे. त्यामुळे कोणत्याही नियमाविरोधात आम्हाला जायचे नाही. क्रीडा प्रेमी देशातील आम्ही सदस्य आहोत.''