सुटीसाठी जा आता अंतराळात!

    दिनांक :08-Jun-2019
- आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक पर्यटकांसाठी खुले
 
 
तभा ऑनलाईन टीम  
वॉशिंग्टन, 
सुटीत फिरायला कुठे जायचे या प्रश्नासाठी आता आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. मात्र, यासाठी भलीमोठी रक्कम मोजावी लागणार आहे. खिशात कोट्यवधी रुपये असतील, तर तुम्ही थेट पृथ्वीच्या कक्षेबाहेर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात (इंटरनॅशनल स्पेस स्टेशन) राहायला जाऊ शकता. हे स्थानक पर्यटकांसाठी तयार असल्याचे नासाने सांगितले आहे.
 
पर्यटक पुढील वर्षी नासाच्या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात जाऊ शकतात. यासाठी तुमच्या खिशात 350 कोटी रुपये असायला हवे. यामध्ये प्राणवायू आणि स्वच्छतागृहाचे सात लाख 80 हजार आणि जेवण, हवा आणि औषधांच्या 15 लाख 61 हजार रुपयांचा समावेश आहे.
 
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाचे उपसंचालक रॉबिन गॅटेन्स म्हणाले की, दरवर्षी कमी अवधीच्या दोन खाजगी अंतराळ मोहीम आखल्या जातील. याचा खर्च खाजगी कंपन्या करतील. अंतराळ पर्यटकांना आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकापर्यंत जाण्यासाठी तीन दिवसांना कालावधी लागेल. ते अमेरिकेच्या यानातून प्रवास करतील.
 
अंतराळाशी संबंधित संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाची स्थापना करण्यात आली आहे. अवकाश स्थानक पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत असून, एका प्रकारचा कृत्रिम उपग्रह आहे. तेथे अंतराळवीर राहतात, काम करतात आणि विविध प्रकारचे प्रयोग करतात.
 
आता, पर्यटन आणि इतर व्यावसायिक उपक‘मांसाठी स्पेस स्टेशन उघडत असल्याचे नासाने म्हटले आहे. मुख्य आर्थिक अधिकारी जेफ डेव्हिट म्हणाले की, नासा व्यावसायिक उपक्रमांसाठी आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन खुले करीत आहे. आम्ही हे पहिल्यांदाच करीत आहोत. दरवर्षी 12 खाजगी अंतराळ पर्यटक हे आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये जाऊ शकतील. याआधी नासाने स्पेस स्टेशनच्या व्यावसायिक वापरावर बंदी घातली होती. पर्यटकांना अंतराळ उड्डाणासाठी प्रशिक्षण आणि आरोग्य सेवा खाजगी कंपन्या देतील, असे नासाने सांगितले. हे स्पेस स्टेशन अमेरिकेने रशियासोबत मिळून बनविलेले आहे.