#ICCWorldCup2019 : पाकिस्तान संघाने केवळ खेळावरच लक्ष केंद्रित करावे : इम्रान खान

    दिनांक :08-Jun-2019
 
लंडन,
'विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्ध खेळताना पाकिस्तान क्रिकेट संघाने केवळ खेळावरच लक्ष केंद्रित करावे', अशा सूचना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानी क्रिकेट संघाला दिल्या आहेत. येत्या १६ जून या दिवशी भारत विरुद्ध पाकिस्तान हा वर्ल्डकपमधील बहुप्रतीक्षित सामना होत आहे. या सामन्यापूर्वी इम्रान खान यांनी ही सूचना केली आहे. पाकिस्तानी खेळाडूंनी 'जशास तसे' हा दृष्टीकोन न ठेवता फक्त आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करावे, असे इम्रान यांनी पाक संघाला सांगितले आहे. भारताचे गडी बाद झाल्यानंतर वेगळ्या प्रकारचा आनंद व्यक्त करण्याची परवानगी मागणारा प्रस्ताव पाक संघाने इम्रान खान यांना पाठवला होता. ही माहिती पाकिस्तान सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'मुंबई मिरर'शी बोलताना दिली होती. 

 
मार्च महिन्यात भारतीय क्रिकेट संघाने रांची येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पुलवामा शहिदांच्या स्मृतिप्रित्यर्थ लष्करी कॅप परिधान केली होती. भारत खेळाला वेगळाच रंग देत आहे असे म्हणत पाकिस्तानने त्यावेळी भारतीय संघाला विरोध दर्शवला होता. यालाच कृतीतून उत्तर देण्याचा पाक संघाचा इरादा होता. मात्र, स्वत: एक खेळाडू म्हणून कारकिर्द गाजवलेले इम्रान खान यांनी पाक संघाला अशा प्रकारचे कोणतेही पाऊल उचलण्याची मनाई केली आहे.
खरे तर असे कोणतेही बदल करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) परवानगी मागावी लागते. यासाठी काही नियमही निश्चित करण्यात आले आहेत. पाकिस्तानने मात्र अशी कोणतीही परवानही मागितली नसल्याचे आयसीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. टीम इडियाने मार्च महिन्यात परिधान केलेल्या आर्मी कॅपसाठी बीसीसीआयने आयसीसीकडे परवानगी मागितली होती. तसेच, आयसीसी वर्ल्ड कपमधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या भारताच्या पहिल्याच सामन्यात महेंद्रसिंग धोनीने घातलेल्या ग्लोव्हजवर अर्धसैनिक दलाचा लोगो होता. आयसीसीने तो हटवण्याचे आवाहन केले आहे.