यंदा दहावीचा निकाल १२.३१ टक्क्यांनी घसरला

    दिनांक :08-Jun-2019
पुणे ,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. दहावीच्या निकालातही कोकण विभागाने बाजी मारली. यंदा गेल्या सात वर्षातील सर्वात नीचांकी निकाल लागल्याचे स्पष्ट झाले. यंदा दहावीचा निकाल ७७.१० टक्के लागला.
 
 
यापूर्वी २००७ मध्ये सर्वात कमी ७८ टक्के निकाल लागला होता. निकालात यंदा देखील मुलींनीच बाजी मारली असून मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल हा १०.६४ टक्क्यांनी अधिक लागला. निकालात कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल ८८.३८ टक्के तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ६७.२७ टक्के लागला.
पुणे विभागाचा निकाल ८२.४८ टक्के लागल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष डॉ.शकुंतला काळे यांनी दिली. मंडळामार्फत राज्यात दहावीची परिक्षा राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत १ मार्च ते २२ मार्च दरम्यान घेण्यात आली. दहावीच्या परिक्षेसाठी एकूण १७ लाख ८१३ विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी नोंदणी केली आहे. यामध्ये ९ लाख २७ हजार ८२२ विद्यार्थी तर ७ लाख ७२ हजार ८४२ विद्यार्थिनींचा समावेश आहे.
ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना १० जूनपासून गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. गुणपडताळणीसाठी संकेतस्थळावरील गुणपत्रिकेच्या स्वस्वाक्षांकित प्रतीसह १० जून ते १९ जून पर्यंत अर्ज करता येणार आहे. तर छायाप्रतीसाठी सोमवार दि.१० जून ते २९ जून पर्यंत अर्ज करता येणार आहे.