रशियन S-400 वरुन अमेरिकेची टर्कीवर ॲक्शन

    दिनांक :08-Jun-2019
अमेरिकेने टर्कीबाबत अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. टर्कीने रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्र प्रणाली विकत घेतली तर टर्कीला अत्याधुनिक एफ-३५ फायटर विमाने मिळणार नाहीत तसेच टर्कीच्या वैमानिकांना एफ-३५ विमानांवर देण्याचे येणारे प्रशिक्षण थांबवू असा इशारा अमेरिकेने दिला आहे.
 
 
अमेरिकेने टर्कीबाबत घेतलेली ही भूमिका भारतासाठी धोक्याची घंटा आहे. कारण भारताने सुद्धा रशियाबरोबर एस-४०० क्षेपणास्त्र प्रणालीचा खरेदी करार केला आहे. अमेरिकेने उद्या भारताबाबत असा निर्णय घेतला तर या निर्णयामुळे भारत-अमेरिका संरक्षण संबंध बिघडू शकतात. आपल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानापासून वंचित रहावे लागेल.
 
मागच्या आठवडयात ट्रम्प प्रशासनातील एका अधिकाऱ्याने या करारावरुन भारताला सूचक इशारा दिला होता. एस-४०० संबंधी भारत-रशियामध्ये झालेला करार महत्वपूर्ण आहे असे ट्रम्प प्रशासनातील अधिकाऱ्याने सांगितले. हा फार मोठा करार नाही या मताशी त्यांनी असहमती दर्शवली.
 
अमेरिकेकडून भारत लष्करी साहित्याची खरेदी करतोय म्हणून रशियाकडून एस-४०० खरेदी करण्याच्या निर्णयाचा भारत-अमेरिका संबंधांवर परिणाम होणार नाही हे मत मान्य नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले होते. पेंटागॉनने टर्कीच्या ४२ वैमानिकांना ३१ जुलैपर्यंत अमेरिका सोडून जाण्यास सांगितले आहे. या वैमानिकांचा अॅरीझोना आणि फ्लोरिडा येथे प्रशिक्षण कार्यक्रम सुरु आहे.
 
टर्कीने अमेरिकेबरोबर १०० एफ-३५ विमानांच्या खरेदीचा करार केला आहे. एफ-३५ हे अमेरिकेचे स्टेल्थ तंत्रज्ञानाने युक्त असलेले अत्याधुनिक फायटर विमान आहे. रडारला चकवा देण्याची क्षमता या विमानात आहे. एफ-३५ प्रकल्पाशी संबंधित टर्कीचा उत्पादन कार्यक्रम बंद करण्याचा इशारा अमेरिकेने दिला आहे. टर्कीश कंपन्या एफ-३५ विमानांना लागणारे एक हजार भाग बनवतात.
 
काय आहे एस-४००
एस-४०० ही जगातील अत्याधुनिक मिसाइल सिस्टिम असून शत्रूची मिसाइल, फायटर विमाने अचूकतेने टिपण्याची क्षमता या सिस्टिममध्ये आहे. एस-४०० मिसाइल सिस्टिमचा भारताच्या शस्त्रास्त्र ताफ्यात समावेश झाला तर चीन, पाकिस्तानचे हवाई हल्ले विफल करता येतील.