अमरावती विभाग विदर्भात आघाडीवर

    दिनांक :08-Jun-2019
14.92 टक्क्याने निकाल घसरला
विभाग राज्यात आठव्या स्थानावर
विभागात बुलढाणा जिल्हा अव्वल
 
अमरावती: महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावीचा निकाल शनिवार 10 जून रोजी दुपारी ऑनलाईन जाहीर झाला. या निकालानुसार अमरावती विभाग नागपूर विभागापेक्षा पुढे असल्यामुळे विदर्भात आघाडीवर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल 14.92 टक्क्यांनी घसरला आहे. विभाग राज्यात 72.98 टक्के निकालासह आठव्या स्थानावर आहे. गेल्यावर्षी 86.49 टक्के निकाल लागला होता. बुलढाणा जिल्हा 77.07 टक्के निकालासह विभागात पहिल्या क्रमांकावर आहे. मुलांपेक्षा मुली उत्तीर्ण होण्यात नेहमीप्रमाणे यंदाही आघाडीवर आहे.

 
 
अमरावती विभागीय मंडळाचे सचिव अनिल पारधी यांनी विभागातल्या पाचही जिल्ह्याच्या निकालाचा तपशील प्रसार माध्यमांसमोर जाहीर केला. यावेळी उपसंचालक एस. एस. पेंदोर, सहसचिव वामन बोलके, डॉ. जयश्री राऊत उपस्थित होते. मार्च 2019 परीक्षेसाठी अमरावती विभागातून 1 लाख 65 हजार 989 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 1 लाख 19 हजार 484 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये 58 हजार 585 मुले व 60 हजार 899 मुली आहे. अनुक्रमे त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 66.04 व 78.80 टक्के आहे. विभागात बुलढाणा जिल्हा 77.07 टक्क्यांसह अव्वल स्थानावर असून या जिल्ह्यातील 40 हजार 72 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 30 हजार 883 उत्तीर्ण झाले. दुसर्‍या क्रमांकावर 75.31 टक्क्यांसह वाशीम जिल्हा आहे. या जिल्ह्यातून 20 हजार 89 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 15 हजार 130 उत्तीर्ण झाले. अमरावती जिल्हा विभागात तिसर्‍या स्थानावर असून या जिल्ह्यातून 40 हजार 513 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 28 हजार 986 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याची टक्केवारी 71.55 आहे. अकोला जिल्ह्यातून 26 हजार 990 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 19 हजार 114 उत्तीर्ण झाले. त्याची टक्केवारी 70.82 आहे. अकोला जिल्हा विभागात चौथ्या स्थानावर आहे. यवतमाळ जिल्ह्यातून 38 हजार 325 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 25 हजार 371 उत्तीर्ण झाले. त्याचे प्रमाण 66.20 असून जिल्हा विभागात पाचव्या स्थानावर राहीला आहे. मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण यंदाही जास्तच आहे.
 
 
25 हजार 950 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत
अमरावती विभागातल्या पाचही जिल्ह्यातील 25 हजार 950 विद्यार्थी 75 टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेवून प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. 47 हजार 636 विद्यार्थी 60 टक्क्यांपेक्षा जास्त, 38 हजार 385 विद्यार्थी 45 टक्क्यांपेक्षा जास्त, 7 हजार 513 विद्यार्थी 35 टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेऊन या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
 
 
156 शाळांचा निकाल शंभर टक्के
अमरावती विभागातल्या 2 हजार 588 शाळेतील विद्यार्थी इयत्ता दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 156 शाळांचा निकाल 100 टक्के लागला असून 28 शाळांचा निकाल 0 ते 10 टक्के लागला आहे. 90.1 ते 99.99 टक्केवारी असलेल्या शाळांची संख्या विभागात 305 आहे. 399 शाळांचा निकाल 80.1 ते 90 टक्के लागला आहे. 70.1 ते 80 टक्क्यांपर्यंत 474 तर 60.1 ते 70 टक्क्यापर्यंत 433 शाळांचा निकाल लागला आहे. 50.1 ते 60 टक्के टक्क्यापर्यंत 333 शाळांचा, 40.1 ते 50 टक्क्यापर्यंत 218 शाळांचा, 30.1 ते 40 टक्क्यापर्यंत 129 शाळांचा, 20.1 ते 30 टक्क्यापर्यंत 68 शाळांचा, 10.1 ते 20 टक्क्यापर्यंत 45 शाळांचा निकाल लागला आहे.
जिल्हा      2017    2018       2019
वाशीम     88.37   89.50     75.31 टक्के
बुलढाणा   88.49   89.16     77.07 टक्के
अकोला     84.02   85.64    70.82 टक्के
अमरावती  85.15    85.46     71.55 टक्के
यवतमाळ  78.03    83.99    66.20 टक्के