पादसेवन भक्ती

    दिनांक :08-Jun-2019
ज्याच्या सहवासात आपण राहतो त्याच्या देहाचा व मनाचा परिणाम आपल्या देहावर व मनावर होतो. हा जीवनाचा नियम आहे. नवर्‍याला नाटकाची आवड असेल, तर बायकोलासुद्धा हळूहळू नाटक आवडायला लागते. भक्ती ज्याला हवी त्याने सत्संगाची कास धरावी. संतावर विश्वास ठेवावा. जो जागेपणी, झोपेत, सुखात, दु:खात, आपत्तीत, एकान्तात भगवंतापासून विभक्त होत नाही तो खरा संत होय. निर्लेप आपलेेपणा, संताच्या-सद्गुरूच्या सेवेत देह गुंतवणे, सद्गुरूकडून येणार्‍या सूचना ग्रहण करण्याची मनाची तयारी, या तीन गोष्टी एकत्र आल्या की पादसेवन भक्ती घडते. खरे पाहता, जगाच्या व्यवहारात भक्ती साधणे तसे कठीणच. त्यातल्या त्यात खरा संत भेटणे कठीण. संत भेटले तर निष्ठा स्थिर होणे त्याहून कठीण. निष्ठा बसली तर ती शेवटपर्यंत निभवता यायला हवी. भगवंताच्या प्राप्तीसाठी कायेने, वाचेने, मनाने आणि आपलेपणाने सद्गुरूची चरणसेवा करणे याला पादसेवन भक्ती म्हणतात. जन्ममरणाची यातायात कायमची सुटावी यासाठी सद्गुरूच्या चरणी अनन्य व्हावे लागते. हा भवसागर तरून जाण्यासाठी सद्गुरुकृपेशिवाय अन्य पर्याय नाही. भवसागर म्हणजे देहासकट सर्व नाशवंत वस्तूंचा समुदाय, आपण या समुदायात जन्म घेतो त्यातच एकरूप होतो आणि अखेर असमाधानात मरतो. सद्गुरूची कृपा म्हणजेच ईश्वरकृपा होय. सद्गुरू परमात्मवस्तू दाखवितो, आत्मसाक्षात्कार करून देतो, सत्य असत्य, चांगले, वाईट, ग्राह्य, अग्राह्य यांचा विवेक करायला सद्गुरूंचे मार्गदर्शन आवश्यक असते. सद्गुरूकडून श्रवण केल्याने परमात्म वस्तूचे ज्ञान अंत:करणात ठसते. परमात्मवस्तू डोळ्यांना दिसत नाही, मनाला आकलन होत नाही.
 
 
संगत्यागावाचून तिचा अनुभव येत नाही. संगत्याग म्हणजे एका भगवंतावाचून मन कोणत्याही वस्तूला न चिकटणे. संगत्याग म्हणजे दृश्य वस्तूच्या बंधनातून मोकळे होणे. संगत्याग, निवेदन म्हणजे देवाला मीपणा अर्पण करणे. विदेह स्थिती. या ठिकाणी आपण राजा जनकाचे उदा. घेऊ शकतो. राजा जनक लौकिकापासून अलिप्त होता. सगळ्यात राहून सर्वांपासून दूर असा विदेही राजा म्हणजे जनक! ईश्वराच्या सर्व अवयवांना आपण कमळाची उपमा देतो. कमलनयन, कमलवंदन, करकमल, पदकमल हृदयकमल. असे आपण का म्हणतो? कारण कमळाजवळ अलिप्तपणा आहे. पाण्यात असून ते पाण्यावरच राहते, चिखलात असून चिखलाच्या वर फुलते. कमळ अनासक्त आहे. ईश्वर जसा करून अकर्ता. सर्व जगाचा पसारा चालवितो, पण अनासक्त रीतीने. म्हणजेच अलिप्तपणा असणे गरजेचे आहे. नंतर सहजस्थिती ‘सह जातं सहजम्‌.’ उदा. जन्माला आलेले मूल अमुक हवे अमुक नको असे म्हणत नाही, ते सुख मिळविण्याचा प्रयत्नही करीत नाही तसेच दु:ख टाळण्याचा प्रयत्न करीत नाही. जितक्या सहजपणे ते सुखाला तयार असते तितक्याच सहजपणे ते दु:खाला तयार होते. यालाच वेदान्तात सहजस्थिती म्हणतात. परमार्थामध्ये कितीतरी गोष्टी आपल्याला अज्ञात असतात. दृश्य व्यवहारात प्रयत्न करून पुष्कळशा गोष्टी साध्य करून घेता येतात तसे परमार्थात नाही. म्हणून सद्गुरूची सेवा करून त्याच्या संगतीत राहिले तर सगळे सहज कळते. लक्ष्मी अहोरात्र विष्णूच्या पायाशी बसलेली दिसते म्हणजेच हे पादसेवन भक्तीचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. भरताने राम वनवासात गेल्यावर िंसहासनावर रामाच्या पादुकांची प्रतिष्ठापना करून, सातत्याने चौदा वर्षे पादुकांची सेवा केली. म्हणून समर्थ म्हणतात, सद्गुरूच्या चरणाची सेवा करणे म्हणजेच पादसेवन. देव, ब्राह्मण, ब्रह्मज्ञानी संत ही सेवेला योग्य स्थाने आहेत. ही चौथी पादसेवन नावाची भक्ती त्रैलोक्याला पावन करणारी आहे. ती आचरली असता साधकाला सायुज्य मुक्ती मिळते म्हणून पादसेवन भक्ती श्रेष्ठ भक्ती आहे. या भक्तीमुळे पुष्कळच लोक संसारसागराच्या पैलतीरास पोहोचतात.
।।जय जय रघुवीर समर्थ।।
 वृषाली विनयराव मानेकर
9527597412