बीसीसीआय-आयसीसीत संघर्षाचे 'चिन्ह'

    दिनांक :08-Jun-2019
वृत्तसंस्था, लंडन
भारताचा यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीच्या ग्लव्हजवर असलेले खंजिर किंवा कट्यारीच्या रूपातील चिन्ह हे सैन्यदलाशी संबंधित नसल्यामुळे तसे ग्लव्हज घालण्यास हरकत नाही, असे मत भारतीय क्रिकेट बोर्डाचे प्रशासक समितीचे प्रमुख विनोद राय यांनी व्यक्त केले असले तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद मात्र या विनंतीचा स्वीकार करण्यास तयार नसल्याचे दिसत असल्यामुळे आयसीसी आणि बीसीसीआय यांच्यात संघर्षाची चिन्हे आहेत.
बीसीसीआयने यासंदर्भात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) पत्र पाठवून धोनीला हे चिन्ह वापरण्याची परवानगी मागितली आहे. पण आयसीसी नियमाच्या आधारावर असे चिन्ह वापरण्यास परवानगी देण्यास इच्छुक नाही. कारण ग्लव्हजवर नियमानुसार केवळ एका प्रायोजकाचे बोधचिन्ह वापरता येते. या ग्लव्हजवर आधीच एसजीचे बोधचिन्ह आहे. त्यामुळे या नियमाचा भंग धोनीच्या ग्लव्हजवरील खंजिराच्या चिन्हाने होतो आहे, असे आयसीसीचे म्हणणे आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साऊदम्प्टन येथे झालेल्या वर्ल्डकप सलामीच्या सामन्यात धोनीच्या ग्लव्हजवरील या चिन्हाची चर्चा झाली. ते सेनादलाचे चिन्ह असल्याचे बोलले जात होते.
 
 
 
 
यासंदर्भात विनोद राय म्हणाले की, बीसीसीआयने आयसीसीला याबाबत औपचारिक विनंती केली आहे. आयसीसीच्या नियमाप्रमाणे कोणताही खेळाडू व्यावसायिक, धार्मिक किंवा सैन्यदलाशी संबंधित चिन्हांचा वापर करू शकत नाही. पण धोनीच्या ग्लव्हजवरील चिन्ह हे व्यावसायिक किंवा धार्मिक नाही. शिवाय, ते पॅराशूट विभागाशी संबंधितही नाही. त्यामुळे धोनीने कोणत्याही नियमाचा भंग केलेला नाही.
आयसीसीने बीसीसीआयला विनंती केली होती की, धोनीच्या ग्लव्हजवरील ते चिन्ह काढून टाकावे. आता बीसीसीआयने केलेल्या विनंतीनंतर आयसीसीची व्यवस्थापन समिती (क्रिकेट) वर्ल्डकपच्या तांत्रिक समितीशी चर्चा करून निर्णय घेईल.
आता बीसीसीआयने हे चिन्ह सेनादलाशी संबंधित नाही, हे सिद्ध करणे अपेक्षित आहे. जर वर्ल्डकप तांत्रिक समितीला ते कारण पटले तर धोनीला या चिन्हासह ग्लव्हज घालण्याची परवानगी मिळू शकते.
धोनी हा पॅराशूट रेजिमेंटचा मानद लेफ्टनंट कर्नल आहे आणि हे चिन्ह या विभागाशी संबंधित आहे.
राय म्हणाले की, जर आम्हाला परवानगी घ्यावी लागत असेल तर आम्ही घेऊ पण आयसीसीने जर नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगितले तर आम्ही त्यानुसारच पावले उचलू. आम्ही अद्याप धोनीशी यासंदर्भात बोललेलो नाही. पण आमचा धोनीला पाठिंबा आहे. तो वादग्रस्त व्यक्ती नाही. आयसीसीने याआधीही आम्हाला अशी परवानगी दिलेली आहे. (सेनादलाशी संबंधित टोपी परिधान करण्यासाठी)
बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी हेदेखील इंग्लंडला जात आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९ जूनला होत असलेल्या सामन्यापूर्वी ते तिथे पोहोचून आयसीसीच्या अधिकाऱ्यांशी या मुद्द्यावर संवाद साधतील.