स्पाईसजेटचे हैदराबाद विमान खराब हवामानामुळे नागपूरकडे वळविले

    दिनांक :08-Jun-2019
नागपूर : हैदराबाद येथून ओडिशा राज्यातील झारसुगडा येथे जाणारे स्पाईस जेट कंपनीचे विमान खराब हवामानामुळे गुरुवारी रात्री ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आले. त्यानंतर कॅबिन क्रूची ड्युटी समाप्त झाल्यामुळे वैमानिकांनी विमान पुन्हा उड्डाण भरण्यास नकार दिल्यानंतर विमान रात्रभर विमानतळावर उभे होते. प्रारंभी कंपनीकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे प्रवाशांनी विमानतळावर गोंधळ घातल्याची माहिती सूत्रांनी दिली. विमान शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता झारसुगडा येथे रवाना झाल्याची माहिती आहे.
 
 
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डीजीसीएच्या निर्देशानुसार कॅबिन क्रू सदस्यांची ११ तासांची ड्युटी संपल्यानंतर वैमानिकांनी रात्री विमान उडविण्यास नकार दिला. त्यामुळे वैमानिकाने विमान विमानतळावर रात्रभर उभे ठेवले. प्रवाशांचे खानपान आणि निवासाची व्यवस्था कंपनीने केली. प्राप्त माहितीनुसार, विमानाने हैदराबाद येथून उड्डाण घेतल्यानंतर झारसुगडा मार्गावर रवाना झाले. यादरम्यान खराब हवामान असल्याची माहिती मिळताच नागपूर एटीएसच्या परवानगीनंतर रात्री ११ वाजता नागपूर विमानतळावर उतरविण्यात आले.