फरिदाबादेतील खाजगी शाळेला भीषण आग

    दिनांक :08-Jun-2019
- शाळा संचालकाच्या पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
फरिदाबाद,
हरयाणातील फरिदाबादमधील एका खाजगी शाळेला आग लागल्याची दुर्दैवी घटना आज शनिवारी घडली. फरिदाबादमधील डबुआ कॉलनीमध्ये असणार्‍या या खाजगी शाळेला शनिवारी सकाळी सात वाजता भीषण आग लागली. या आगीत शाळा संचालकाची दोन मुले आणि पत्नीचा मृत्यू झाला. सुदैवाने वर्ग सुरू नसल्याने अनर्थ टळला. मागील महिन्यात सूरत येथील खाजगी शिकवणी वर्गाला आग लागून तेथील मुले आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती.
 
 
 
फरिदाबादमधील एएनडी कॉलनीत ही शाळा आहे. शाळेच्या इमारतीला अचानक आग लागली. शाळेच्या इमारतीतून काळा धूर पसरत असल्याचे स्थानिकांनी पाहिले. अग्निशमन दलालाही याबाबत माहिती देण्यात आली. ते ताबडतोब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने मदतकार्य सुरू करण्यात आले.
आगीत अडकलेल्या कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाला अनेक समस्या येत होत्या. दुसर्‍या मजल्यावरील खिडकी तोडून सर्वांना बाहेर काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परंतु, संपूर्ण प्रयत्न करूनही तिघांना वाचवण्यात यश आले नाही.
 
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याची शक्यता आहे. याठिकाणी विजेच्या तारांचे मोठे जाळे पसरले आहे. अनेक वेळा या भागात आगीचे प्रकार घडत असल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. दरम्यान, याबाबत अधिक चौकशी सुरू असून, चौकशीनंतरच आगीचे कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.