नरिंसह पीठ नागपुरातील जडी यांचे नरिंसह मंदिर

    दिनांक :08-Jun-2019
हिंदू  प्राचीन ग्रंथसंपदेत, भगवान विष्णूंचे 10 अवतार वर्णिले आहेत. एकेक अवतार म्हणजे पृथ्वीवरील जीवांची हळूहळू होत गेलेली उत्क्रांतीच! विष्णूचा चौथा अवतार नरिंसह अवतार आहे. आधीच्या वराह अवतारातील संपूर्ण जलमय सृष्टीतून जमिनीचा भाग वर आला व 3/4 जल व 1/4 धरती अशी पृथ्वीची व्याप्ती झाली. या अवस्थेत नरिंसह अवतार झाला व प्रिमॅच्युअर्ड मानव जन्मास आला. सर्वात क्रोधी रूप भगवंताने या अवतारात धारण केले.
शास्त्रीय भाषेत अवतार व त्यातील दंतकथा यांचा मथितार्थ विज्ञानाने उलगडला आहे. धर्मप्रवणतेची जागा धर्मलोपाने घेतली, तरी धर्मातील काही अतर्क्याचे निरसन करू शकत नाही. कुंडलिनी जागृत अवस्था ही योगशास्त्रानेही विज्ञानाच्या आधारे मान्य केली आहे. त्यात अंधश्रद्धेला जागा नाही. मानसिक तपोबल, ध्यान धारणा या शास्त्रीय प्रयोगानेच कुंडलिनी जागृत होते, कुठल्याही वैज्ञानिक प्रयोगाने नाही. मात्र, साधकाची तेवढी तयारी पाहिजे.
रामाचे नवरात्र, दत्ताचा सप्ताह, देवी वा बालाजीचे नवरात्र इ. सर्वसाधारण हिंदूंच्या  घरात करताना आढळून येते. परंतु, ‘नरिंसहाचे नवरात्र’ फारच विरळ घरांमध्ये साजरे होते. नागपुरात अशी 7-8 घराणी असतील. शेकडो वर्षांपासून नरिंसह नवरात्राची अखंड परंपरा नागपुरातील महाल येथील भास्करराव जडी व परिवार या घराण्याने आजतागायत जपली. ही 7 वी पिढी आहे. पूर्वी हे घराणे पाटणसावंगीला होते (1885 च्या आधी). तेथील चंद्रभागा नदीतून एका दृष्टांताद्वारे नरिंसहाची सुबक मूर्ती बाहेर काढली व पाटणसावंगीत देव्हार्‍यात ठेवली. आजही ती नागपुरात जडींच्या पूजेत आहे. धर्म, शास्त्र, पंडित, उपासना करणारे जडींच्या पूर्वजांनी घरातील शेकडो जुन्या जीर्ण झालेल्या पोथ्या यांचा लगदा करून वनस्पतींच्या पर्णांचा रस व िंडक यात भिजवून अतिशय सुंदर नरिंसहाचा मुखवटा बनविला. नरिंसह जयंतीला पाटणसावंगीला त्याची मिरवणूक गावात काढायचे. आजही तो मुखवटा जयंतीच्या दिवशी देव्हार्‍यात ठेवतात.
 
 

 
1885 साली जडी कुटुंब नागपुरात आले. तत्कालीन राजे भोसल्यांनी (इंग्रजी अंमल असूनही) त्यांना महाल भागात वास्तव्यास जागा दिली. तिथे वाडा व देवघर बांधले तेच जडींचे नरिंसह मंदिर. 1885 सालचा तो वाडा आजही सुस्थितीत आहे. अर्थात, प्रासादाचे रूप बदलले आहे. जडी यांच्या सततच्या उपासनेने व नरिंसहाच्या अव्याहत भक्तीने तो भाग जागृत व ऊर्जित ठेवला आहे. सध्या भास्करराव जडी यांच्याकडे उपासना आहे. जुनी वास्तू पुनर्जीवित करून, शोभिवंत, सुबक, छोटेखानी, पण प्रासादिक मंदिर पाहावयास मिळते. जडी यांनी देव्हार्‍याचे मंदिर केले. ती जडी यांची वैयक्तिक वास्तू आहे.
जडींचे मंदिर देखणीय, रमणीय आहे. अतिशय स्वच्छ व शोभिवंत मंदिरात जागृत नरिंसहापुढे नतमस्तक झाल्यास, शरीरात ऊर्जा प्रवाहित झाल्याची अनुभूती येते. मन प्रसन्न होते व दु:खी जळमटे दूर होतात. हे स्थानमाहात्म्य आहे.
वैशाख शुद्ध चतुर्दशी हा दिवस नरिंसह जयंती म्हणून साजरा होतो. याच दिवशी सत्ययुगात श्रीनरिंसह प्रगट झाले होते. या उग्र देवतेची मनोभावे उपासना गेल्या कित्येक वर्षांपासून भास्करराव करतात. ही 7 वी पिढी आहे. 8 पिढ्या हे चालेल, असा संकेत आहे. 8 व्या पिढीतील वारस विशाल व अनिरुद्ध हे पुढील वारसा सांभाळण्यास सिद्ध आहेत.
संपूर्ण नवरात्रात भास्करराव उन्मनी अवस्थेत असतात. सर्व व्यवहार करताना त्यांची एकाग्रता कायम असते. जयंतीच्या दिवशी सायंकाळी कीर्तनात बुवांनी हिरण्यकश्यपुने खांबाला लाथ मारली म्हणताच उन्मनी अवस्थेत ध्यानस्थ बसलेल्या भास्कररावांची कुंडलिनी जागृत होते. सर्व शरीर लाकडासारखे ताठ व कडक होते. 8 ते 10 लोक, त्यांचे ताठ शरीर झोपल्या अवस्थेत जमिनीपासून 4-5 फूट वर उचलतात. ‘गोविंदा ’चा गजर होतो. वातावरण विस्मयित व थोडेसे गंभीर होते. जलिंसचन व पंख्याने वायुिंसचन केल्यावर थोड्या वेळाने हा शक्तिपात थांबतो व त्यांना खाली आणून टेकवून बसवितात. तेव्हा सर्व भाविक समाधानाचा नि:श्वास सोडतात. सहजावस्थेत येण्यास साधकाला काही अवधी लागतो. कुंडलिनी जागृत अवस्थेत साधकाला काहीही होऊ शकते. घरातील मंडळी अक्षरश: अश्रू ढाळतात. परंतु, परमेश्वरस्वरूपाची किंचित  काळ का होईना अनुभव घेतलेल्या या साधकाला काहीही होत नाही.
आवश्यक आचारांना स्वीकारून धर्मविधी पाळण्याचे कर्म केल्यास त्रिवर्णसाधनाचे यश संपादिता येते. एवढे मात्र खरे!
भेटीचेनि सुखे मनचि होय मुके।
ते रूप देखे परी बोलवेना।।
 रमेश विनायक पोफळी
7775900824