माझ्यासाठी वाराणसी आणि केरळ दोन्हीही सारखेच - नरेंद्र मोदी

    दिनांक :08-Jun-2019
तिरुवनंतपुरम,
नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने दणदणीत यश मिळवले. मात्र दक्षिण भारतातील केरळमध्येभाजपाला एकही जागा जिंकता आली नव्हती. मात्र असे असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळचा दौरा करून तेथील जनतेचे आभार मानले. तसेच माझ्यासाठी केरळ हे तेवढेच महत्त्वाचे आहे जेवढी वाराणसी आहे, जे आम्हाला निवडून देतात ते आमचे आहेत आणि ज्यांनी यावेळी आम्हाला निवडून दिले नाही, तेही आमचेच आहेत, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सकाळी केरळमध्ये दाखल झाले. त्यानंतर मोदींनी गुरुवायूर येथील प्रसिद्ध श्रीकृष्ण मंदिरात पूजा केली. यावेळी मोदींची पद्मतुला करण्यात आली. त्यानंतर सभेला संबोधित करताना मोदींनी केरळमधील जनतेचे आभार मानले.
 
 
''जनता जनार्दन ईश्वराचे रूप आहे. ही बाब यावेळच्या निवडणुकीत देशाने पाहिली आहे. राजकीय पक्ष जनतेचा कल जाणू शकले नाहीत, पण देशातील जनतेने भाजपा आणि एनडीएच्या बाजूने मतदानाचा कौल दिला. त्यासाठी मी विनम्रपणे जनतेचे अभिवादन करतो.'' असे मोदी म्हणाले.
आम्ही भाजपाचे कार्यकर्ते निवडणुकीच्या राजकारणासाठी मैदानात उतरत नाही. आम्ही 365 दिवस जनतेच्या सेवेमध्ये व्यस्त असतो. आम्ही केवळ सरकार स्थापन करण्यासाठी राजकारणात आलेलो नाही. आम्ही देश घडवण्यासाठी राजकारणात उतरलो आहोत. जनता आम्हाला पाच वर्षांसाठी लोकप्रतिनिधी बनवते. मात्र आम्ही जनसेवक आहोत, जनप्रतिनिधी आजीवन असतात, असेही मोदींनी सांगितले.