प्रतीक्षा संपली; मान्सून केरळमध्ये दाखल

    दिनांक :08-Jun-2019
तभा ऑनलाईन टीम 
मुंबई,
गेल्या अनेक दिवसांपासून देशातील नागरिक उकाड्याने त्रासलेले असताना उशिरानेच का होईना मान्सून अखेर आज मृग नक्षत्राच्या मुहुर्तावर केरळमध्ये दाखल झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून केरळमध्ये मान्सूनला अनुकूल वातावरण निर्माण झाले होते, अखेर आज केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्याची अधिकृत घोषणा भारतीय हवामान खात्याने केली आहे.
 
मान्सूनचे आगमन लांबणीवर पडल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. अखेरीच 1 जून या मान्सूनच्या केरळमधील आगमनाच्या अपेक्षित तारखेनंतर तब्बल आठवडाभराने आज मान्सून केरळमध्ये दाखल झाला. दरम्यान, केल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्रात मान्सूनपूर्व सरी बरसत आहेत. मात्र मान्सूनचे केरळमधील आगमन लांबल्याने महाराष्ट्रामध्येही मान्सून थोडा उशिरा पोहोचण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. विदर्भात उष्णतेच्या लाटेची नोंद झाली आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती.
 
 
 
तसेच येत्या आठ ते दहा तासात सोसाट्याच्या वाऱ्यासह अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, गोंदिया, कोल्हापूर, नागपूर, परभणी, पुणे, रत्नागिरी, सोलापूर, वर्धा या शहरांमध्ये पाऊस होईल अशी शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. तर केरळमध्ये मान्सून धडकला असल्याची माहितीही स्कायमेटने दिली आहे.
 
 
मान्सूनच्या आगमनाने गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्याने आणि उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.