उद्धव ठाकरे दहावेळा अयोध्येला गेले तरी मंदिर होणार नाही: आठवले

    दिनांक :08-Jun-2019
दिल्ली,
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नवनिर्वाचित खासदारांना सोबत घेऊन १६ जून रोजी अयोध्येला जाणार आहेत. शिवसेनेच्या या दौऱ्याची रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी खिल्ली उडवली आहे. 'उद्धव ठाकरे हे दहावेळा अयोध्येला गेले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरच राम मंदिराची निर्मिती होईल', असं आठवले यांनी म्हटलं आहे.
 
 
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले आहेत. लोकसभेच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी कार्ला गडावरील एकविरा देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी खासदार आणि कुटुंबासह कोल्हापुरातील अंबाबाईच्या मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. आता ते १६ जूनला अयोध्येला जाऊन राम लल्लाचे दर्शन घेणार आहेत. या दौऱ्याची देशभरात चर्चा सुरू आहे. मागील वर्षी उद्धव ठाकरे यांनी 'पहले मंदिर...फिर सरकार...'अशी घोषणा दिली होती. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपवर पुन्हा एका दबाव टाकण्यासाठी त्यांचा हा दौरा होत असल्याचं बोललं जात आहे.
या दौऱ्याविषयी एका वृत्तवाहिनीशी बोलताना रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली. 'उद्धव यांचा हा दौरा शिवसेनेच्या नव्या खासदारांना अयोध्या दाखवण्यासाठी असेल तर काही हरकत नाही. पण मंदिर उभारणीसाठी त्याचा उपयोग होणार नाही. उद्धव ठाकरे १० वेळा अयोध्येला गेले तरी मंदिर होणार नाही. राम मंदिर व्हावं असं माझंही मत आहे. मात्र, त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वाट पाहावी लागेल, असं ते म्हणाले. न्यायालयाच्या निर्णयानंतरच मंदिराची निर्मिती होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.