ज्येष्ठ लेखक फिरोज अशरफ यांचे अपघाती निधन

    दिनांक :08-Jun-2019
मुंबई,
युक्रांदचे माजी उपाध्यक्ष व सुप्रसिद्ध लेखक फिरोज अशरफ यांचे आज सकाळी मुंबईत अपघाती निधन झाले. मुबंईतील जोगेश्वरी परिसरात त्यांना एका रिक्षाने धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. अशरफ यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु योग्य वेळी उपचार न मिळाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
 
 
अशरफ मराठी, उर्दू आणि हिंदीतील प्रसिद्ध लेखक होते. मराठी भाषिकांसाठी पाकिस्तानच्या सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडीची माहिती करून देणारे ते एकमेव लेखक होते. नवभारत टाइम्स या दैनिकासाठी सुमारे २५ वर्षे त्यांनी 'पाकिस्ताननामा' हे सदर लिहिले. ते अत्यंत लोकप्रियही झाले. यातील निवडक लेखांचे हिंदी पुस्तकही प्रकाशित झाले असून, लोकवाङ्मयगृहाने त्याची मराठी आवृत्ती काढली आहे. उत्तम संवादक, चांगला लेखक, अभ्यासू पत्रकार, उत्कृष्ट वक्ता व अतिशय प्रेमळ माणूस अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.