११ वर्षीय मुलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या

    दिनांक :09-Jun-2019
स्मशानभूमीत मिळाला मृतदेह
 
हमीरपूर: उत्तरप्रदेशमध्ये अलिगडमधील तीन वर्षांच्या मुलीच्या निर्घृण हत्येची घटना ताजी असताना उत्तरप्रदेशच्याच हमीरपूरमध्ये एका 11 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आरोपी फरार झाले असून, पोलिसांकडून आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे. गावात तणावाचे वातावरण असून, मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आरोपींच्या शोधासाठी पाच विशेष पथकांची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
 

 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हमीरपूर येथील कुरारा परिसरात ही घटना घडली आहे. येथील एका कुटुंबातील सदस्य गेल्या दोन महिन्यांपासून मजुरीच्या कामासाठी कानपूरमध्ये राहत आहेत. त्यामुळे ही 11 वर्षांची मुलगी गेल्या दोन महिन्यांपासून घरात एकटीच होती. शुक्रवारी रात्री काही गुंड घरात घुसले आणि मुलीला उचलून बाहेर घेऊन गेले. त्यानंतर नराधमांनी तिच्यावर अत्याचार करून गळा दाबून तिचा जीव घेतला. त्यानंतर तिचा मृतदेह गावाच्या स्मशानभूमीत फेकला. सकाळी गावकर्‍यांना स्मशानभूमीत तिचा मृतदेह मिळाला.
काही ग्रामस्थांनी या मुलीची ओळख पटवली आणि तिच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण होते. माहिती मिळाल्यावर पोलिस घटनास्थळी पोहोचले. मात्र, संतप्त गावकर्‍यांनी पोलिसांना मृतदेह ताब्यात घेऊ दिला नाही. तिच्या कुटुंबीयांनी सीबीआयच्या चौकशीची मागणी केली. अखेर पोलिसांच्या आश्वासनानंतर गावकरी शांत झाले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.