हवाई दलाच्या बेपत्ता विमानाची माहिती देणाऱ्यास 5 लाखांचे बक्षीस

    दिनांक :09-Jun-2019
तभा ऑनलाईन टीम 
नवी दिल्ली,
हवाई दलाचे एएन-32 हे मालवाहतूक विमान 3 जून पासून बेपत्ता आहे. सोमवारी हे विमान दुपारी 12 वाजून 25 मिनिटांनी जोरहाटहून निघाले होते. पण दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. या विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटताच हवाई दलाने विमानाचा शोध सर्वत्र सुरू केला आहे. मात्र अद्याप या बेपत्ता विमानाचा शोध लागलेला नाही. विमानात आठ कर्मचारी आणि पाच जवान आहेत. हवाई दलाने या विमानाची माहिती देणाऱ्यास बक्षीस जाहीर केले आहे. विमानाची ठोस माहिती देणाऱ्याला पाच लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे.
 
 
शिलाँगमध्ये संरक्षण दलाचे जनसंपर्क अधिकारी विंग कमांडर रत्नाकर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर मार्शल आर. डी. माथूर, AOC इन कमांड, इस्टर्न एअर कमांड यांनी या बेपत्ता विमानाची माहिती सांगणाऱ्याला पाच लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. बेपत्ता विमानाच्या लोकेशनची माहिती 0378-3222164, 9436499477, 9402077267, 9402132477 या क्रमांकावर देता येईल असे ही सिंह यांनी सांगितले. विमानाचा शोध घेण्यासाठी हवाई दलाने सर्व उपलब्ध यंत्रणा कामाला लावल्या आहेत.
 
 
पत्नीच्या डोळ्यादेखत पतीचे विमान झाले गायब; कुटुंबीय चिंताग्रस्त
एएन-32 या विमानाचे वैमानिक आशिष तन्वर (29) हेही बेपत्ता आहेत. त्यांची पत्नी संध्या हवाई दलाच्या वाहतूक नियंत्रण कक्षात सेवेवर होत्या. पत्नीच्या डोळ्यादेखत पायलट पतीचे विमान रडारवरून गायब झाले. हा घटनाक्रम त्यांनी जवळून अनुभवला. एएन-32 ने दुपारी 12.25 च्या सुमारास आसामच्या जोरहट तळावरुन अरुणाचल प्रदेशमधील मिचुका येथे जाण्यासाठी उड्डाण केले. तन्वर कुटुंबिय मूळचे हरयाणाच्या पलवलचे आहे.
 
अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आणि अद्ययावत माहिती मिळावी म्हणून आशिषचे वडिल राधेलाल आसामला गेले आहेत. त्याची आई घरीच आहे. या घटनेमुळे आई पूर्णपणे कोसळून गेली आहे. त्यांनी डबडबलेल्या डोळ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बेपत्ता विमानाच्या शोधासाठी सर्व ती यंत्रणा कामी आणावी अशी मागणी केली. तन्वर कुटुंबाला लष्करी सेवेची परंपरा आहे. आशिषची मोठी बहिणही हवाई दलामध्ये स्क्वाड्रन लीडर आहे.
 
बेपत्ता वैमानिक मुलाच्या शोधासाठी वडिलांची शर्थ
एएन-32 विमानामधील तेरा जणांपैकी फ्लाईट लेफ्टनंट मोहित गर्ग हेही एक आहेत. काही दिवसांपूर्वीच सुटी संपवून ते सेवेत दाखल झाले होते. गर्ग यांचे कुटुंबीय पतियाळा (पंजाब) येथील सामना गावी परतले असून, काही तरी चमत्कार घडावा अशी प्रार्थना करीत आहेत. मोहित यांची आई सुलोचना देवी हृदय विकाराने त्रस्त असल्याने त्यांना या दुर्घटनेबाबत काही सांगण्यात आलेले नाही. मोहित यांचे वडील शोधासाठी प्रयत्नांची शर्थ करीत आहेत.
यापूर्वी याच जातीची आणखी चार विमाने अशीच कोसळली होती. रशियाहून पाठवण्यात आलेले पहिलेच विमान मार्च 1986 मध्ये कोसळले होते. ते विमान व त्यातील सातही जणांना पत्ताच लागला नव्हता. चार वर्षांनी केरळच्या पोनमुडी गावापाशी दुसरे विमान कोसळले. जून 2009 मध्ये अरुणाचल प्रदेशातच एक विमान कोसळून 13 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या विमानांमध्ये सुधारणा केल्या. तरीही 12 जुलै 2016 रोजी चेन्नईहून पोर्ट ब्लेअरला निघालेले विमान बेपत्ता झाले. त्याचा शोध लागला नाही.