समाजवादी पक्षाला उभारी देण्यासाठी मुलायम सिंह यादव मैदानात

    दिनांक :09-Jun-2019
नवी दिल्ली,
बसपासोबत महाआघाडीकरूनही लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर समाजवादी पक्षाला उभारी देण्यासाठी खुद्द मुलायम सिंह यादव मैदानात उतरले आहे. मुलायम सिंह यादव यांनी पक्षाची कमान आपल्या हाती घेतली आहे. सध्या ते पक्षातील वरिष्ठ नेत्यांना भेटून पक्षाच्या पराभवाची मीमांसा करत आहेत.

 
समाजवादी पक्षाची पुढील रणनितीसाठी बनविण्यासाठी मुलायम सिंह सक्रीय झाले आहे. मात्र पक्षाला मजबूत करण्यासाठी त्यांची पक्षात काय भूमिका असणार हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी समाजवादी पक्षाकडून देखील टाळाटाळ करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुलायम सिंह रोज पक्ष कार्यालयात जात आहेत. येथे ते पक्षाच्या नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. त्यांचं नवीन घर देखील पक्षाच्या कार्यालयानजीकच आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुलायम सिंह यांनी पक्षापासून दुरावलेल्या नेत्यांशी चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. तसेच ते पक्षाच्या सध्याच्या स्थितीमुळे चिंतीत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे, जुन्या नेत्यांचा फिडबॅक घेऊन पुन्हा एकदा पक्षबांधणीवर मुलायम सिंह जोर देणार असं दिसत आहे.