विधानसभेला तुम्हाला दिसेल, भाकरी फिरवलेली असेल : शरद पवार

    दिनांक :09-Jun-2019
मुंबई,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आज वर्धापनदिन आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सकाळी ११ वाजता फेसबुक लाईव्ह करून कार्यकर्त्यांशी आणि सर्वसामान्यांशी संवाद साधला. फेसबुक लाईव्हदरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत तेच तेच चेहरे नकोत, असा विनंतीवजा प्रश्न एका प्रेक्षकाने पवार यांना विचारला असता विधानसभेला तुम्हाला दिसेल, भाकरी फिरवलेली असेल, असे उत्तर दिले. 

 
आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष तरूण कार्यकर्त्यांना सर्वाधिक संधी देणार असल्याचे शरद पवार म्हणाले. पक्षातल्या लोकांशी याबाबत बोलणे झालेले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी, भोसरी येथे गुरुवार आयोजित प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते की,’भाजपाला जनतेने पुन्हा संधी दिली. मात्र विधानसभेसाठी लोकसभेप्रमाणे मतदान होत नाही. स्थानिक पातळीवरील प्रश्‍न, उमेदवार, काम करण्याची पद्धत, जनतेमध्ये असलेला विश्‍वास या बाबींवर मतदान होते. कोणाचे काम चांगले यावर जनता विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संधी देत असते.
 
 
 
विधानसभा अडीच महिन्यांवर आलेली असल्याने आता कोणतेच काम हातात न घेता आजपासून कामाला लागा. विधानसभेसाठी सर्वांनी एकत्र बसून प्रत्येक मतदारसंघातून एकच नाव सुचवा. सर्वांना विश्‍वासात घेताना नवा चेहरा देण्याचा प्रयत्न करा. नागरिकांना बदल हवा असतो. तोच तो चेहराही मतदार नको असतो. असेही पवार यावेळी म्हणाले.