तामिळनाडूत केंद्र सरकारच्या कार्यालयावरील पाट्यांना फासले काळे

    दिनांक :09-Jun-2019
वृत्तसंस्था 
चेन्नई,
तामिळनाडूत हिंदी भाषेच्या विरोधातील मोहीम पुन्हा एकदा तीव्र होताना दिसत आहे. शनिवारी तिरुचिराप्पल्ली परिसरात बीएसएनएल, विमानतळ, टपाल कार्यालय, रेल्वे स्थानकांच्या कार्यालयावर तसेच अन्य काही केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या आस्थापनांच्या कार्यालयावर लावण्यात आलेल्या बोर्डवरील हिंदी नावावर काळे फासण्याचे प्रकार घडले. या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
तामिळनाडूत गेल्या काही दिवसांपासून हिंदी भाषेचा विरोध वाढला आहे. याची सुरूवात केंद्र सरकारने अलिकडेच शाळांमध्ये तीन भाषा प्रणालीचा प्रस्ताव मांडल्यापासून झाली. यामध्ये शालेय भाषा, मातृभाषा आणि तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्यात आली होती. या निर्णयाला तमिळनाडूतून प्रचंड विरोध झाला. केंद्र सरकार राज्यावर हिंदी लादत असल्याचा आरोपही विरोधकांनी केला. राज्यात दोन भाषांचा फॉर्म्युलाच कायम ठेवावा, अशी मागणीही विरोधकांनी केली होती. या प्रस्तावाला डीएमके आणि मक्कल नीधिमय्यमसह तामिळनाडूतील अन्य राजकीय पक्षांनी तीव्र विरोध दर्शवला होता. हिंदी थोपवण्याचा प्रयत्न केल्यास वाईट परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशाराही डीएमके पक्षाकडून देण्यात आला होता.
 

 
केंद्र सरकारच्या कार्यालयावरील हिंदीतील नावावर काळे फासण्याच्या प्रकारामुळे हिंदी भाषेवरून पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याशिवाय तामिळनाडूत हिंदीचा विरोध करण्याच्या नावाखाली काही राजकीय पक्ष येथे आपली पोळी भाजण्याच्या प्रयत्नातही आहेत.