बंगालमध्ये भाजपाच्या तीन कार्यकर्त्यांची हत्या

    दिनांक :09-Jun-2019
कोलकाता,
पश्चिम बंगालमध्ये सुरू झालेला हिंसाचार अद्यापही थांबण्याचे नाव घेत नाही. पश्चिम बंगालच्या 24 उत्तर परगनामध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. या हिंसाचारात तीन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला असून तसेच पक्षाचे पाच कार्यकर्ते बेपत्ता असल्याचा दावाही भाजपाकडून करण्यात आला आहे. दरम्यान, तृणमूल काँग्रेसनेही भाजपाच्या कार्यकर्त्यांवर हिंसाचार पसरवल्याचा आणि आपल्या कार्यकर्त्याची हत्या केल्याचा आरोप केला आहे. या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला कोलकाता पोलिसांकडून दुजोरा देण्यात आला. तसेच हा आकडा वाढण्याच्या शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे . 

 
संदेशखाली येथील नजत परिसरात पक्षाच्या झेंडा उतरवण्यावरून हा हिंसाचार सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. तसेच यानंतर गोळीबार आणि बॉम्बही फेकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी शनिवारी बूथ पातळीवरील एका बैठकीचे आयोजन केले असल्याचा दावा तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आला. तसेच या बैठकीदरम्यान भाजपाचे 10-12 कार्यकर्ते या बैठकीत शिरले आणि आमचे कार्यकर्ते कयूम अली मोला याच्यावर गोळ्या झाडल्या. तसेच त्यांना बाहेर नेऊन त्यांच्यावर चाकूनेही वार केले, अशी माहिती 24 उत्तर परगनाचे तृणमूल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ज्योतिप्रिया मौलिक यांनी दिली. तसेच भाजपाच्या तीन खासदारांनी संदेशखालीचा दौरा केला असून आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची हत्या करण्याचे निर्देश दिले असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
 
 
आम्हाला कोणाचाही मृत्यू व्हावा असे वाटत नाही. परंतु आता पाणी डोक्यावर गेले असून आम्ही याचे उत्तर नक्कीच देऊ. कोणालाही आम्ही सहजरित्या सोडणार नाही, असा इशाराही मौलिक यांनी दिला. तसेच तृणमूल काँग्रेसचे 2 कार्यकर्ते अद्यापही बेपत्ता असून त्यांचीदेखील हत्या करण्यात आली असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. तर दुसरीकडे या हिंसाचारात तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला नसून प्रदिप मोंडल, तपन मोंडल आणि सुकांतो मोंडल या भाजपाच्या कार्यकर्त्यांचा गोळीबारात मृत्यू झाला असलाची माहिती भाजपाचे पश्चिम बंगालचे सरचिटणीस बासू यांनी दिली.
 
भाजपा नेते मुकुल रॉय यांनीदेखील ट्विट करून तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोळीबारात भाजपाच्या तीन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप केला. तसेच या हिंसाचारासाठी तृणमूल काँग्रेस जबाबदार असल्याचे सांगत यासंदर्भात गृहमंत्र्यांकडे अहवाल सोपवला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.