नवे तंत्रज्ञान आणि रोजगारांची निर्मिती

    दिनांक :09-Jun-2019
- डॉ. भरत झुनझुनवाला
 
एटीएम आल्यामुळे बँकेतील रोखपालाच्या नोकर्‍या कमी झाल्या. मोबाईल फोन आल्यामुळे एसटीडी बूथचा धंदा पार लयाला गेला. अशी अंतहीन अनेक उदाहरणे आहेत. मात्र, नवीन तंत्रज्ञान आल्यामुळे जर काही रोजगार संपुष्टात येत असतील, तर अनेक नवीन प्रकारच्या रोजगारांचीही निर्मिती यामुळे होत असते, हीदेखील वस्तुस्थिती आहे. याचाच अर्थ, नव्या तंत्रज्ञानामुळे रोजगारावर मोठे संकट कोसळलेले नाही. उदाहरणार्थ, एटीएम आले तर त्याच्या देखभाल, दुरुस्ती व संचालनक्षेत्रात नवीन नोकर्‍या निर्माण झाल्या. त्याचप्रमाणे मोबाईल फोन आल्यानंतर त्याची देखभाल व दुरुस्तीचे काम आले. यामुळे असंख्य लोकांचा उदरनिर्वाह सुरळीत चालत आहे.
 
एकूण पाहिले असता, नवीन तंत्रज्ञान नेहमीच काही ना काही खळबळ माजवत असते आणि येणार्‍या काळात या संदर्भात घडणार्‍या घडामोडी अधिकच वेगवान होण्याची शक्यता आहे. याच शृंखलेत आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) म्हणजेच एआयचा सध्या चांगलाच बोलबाला आहे. यात संशोधनासाठी वैज्ञानिकांची आवश्यकता कमी भासणार आहे. स्वयंचलित गाड्यांमुळे वाहनचालकांच्या रोजगारावर गदा येऊ शकते. आम्ही हे नवीन संशोधन थांबवू शकत नाही आणि थांबवूदेखील नये. प्रश्न केवळ या तांत्रिक संशोधनाला अटकाव करण्याचा नाही, तर नवीन कामांमध्ये नवीन रोजगारांची पुरेशा प्रमाणात निर्मिती झाली पाहिजे, हा मुख्य मुद्दा आहे. एम्प्लॉयमेंट ॲनॅलिसिस नावाच्या वेबसाईटनुसार, 1900 मध्ये अमेरिकेत 1,09,000 घोडागाडी धावत होत्या आणि वीजतंत्री नगण्य संख्येत होते. 2002 मध्ये घोडागाडी शून्यावर आली आणि वीजतंत्रींची संख्या 8,82,000 एवढी झाली. याचाच अर्थ, जेवढे जुने रोजगार नष्ट झाले त्यापेक्षा दहा पट अधिक नवीन रोजगारांची निर्मिती झाली. 

 
 
नवीन तंत्रज्ञानामुळे, नव्या घडामोडींमुळे किती जुने रोजगार संपुष्टात येतील, या मुद्यावर अर्थतज्ज्ञांचे एकमत नाही. कार्ल बेनेडिक्टतर्फे करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, अमेरिकेतील 47 टक्के रोजगार संकटात येऊ शकतात, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. जागतिक बँकेने या अभ्यासावर सखोल विश्लेषण व संशोधन केले आणि केवळ नऊ टक्के रोजगार नष्ट होतील, असा अंदाज वर्तविला. जर 47 टक्के रोजगार नष्ट होऊनही 60 टक्के रोजगार नव्याने निर्माण होत असतील, तर ही सुखावणारी बाब आहे. जर नऊ टक्के रोजगार नष्ट होत असतील आणि केवळ चार टक्के नव्याने निर्माण होत असतील, तर ती नक्कीच दु:खद गोष्ट आहे. त्यामुळे नवीन रोजगार अधिकाधिक संख्येने निर्माण झाले पाहिजेत, यावर आम्ही लक्ष केंद्रित करायला हवे.
 
मी आशावादी आहे. कितीही जुने रोजगार नष्ट होऊ देत, त्यापेक्षा अधिक नवीन रोजगारांची निर्मिती होऊ शकते, यावर माझा विश्वास आहे. असे समजा की, एखादा शेतकरी आपल्या पिकासाठी आठवड्यातील सहा दिवस काम करीत होता. आता वीज, ट्रॅक्टर आणि इंटरनेटमुळे सातऐवजी चार दिवस काम करूनही त्याला आधीएवढेच उत्पादन घेता येणे शक्य होऊ शकेल. यामुळे दोन दिवस अतिरिक्त मिळाले. या दोन दिवसांत तो कुठले नवीन काम शिकून त्यापासून फायदा मिळवू शकतो. म्हणजेच वेळेच्या सदुपयोगाने नवीन रोजगारांची निर्मिती होणार आहे.
 
आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या एका अभ्यासानुसार, नवीन तंत्रज्ञानामुळे उच्च क्षमतेच्या, सर्वोत्तम दर्जाच्या अभियंत्यांच्या नोकर्‍या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. मध्यम क्षमतेच्या लोकांची गरज खूप कमी होऊन जाईल आणि निम्न क्षमतेच्या कामगारांच्या रोजगारातही वृद्धी होईल. येणार्‍या काळात केवळ उच्च आणि निम्न वर्गच अस्तित्वात राहील. मध्यमवर्गाचा सफाया होईल. त्यामुळे उच्च क्षमतेचे रोजगार अधिकाधिक संख्येने तयार करणे, हेच आमच्यासमोरील मोठे आव्हान आहे.
 
उच्च दर्जाचे रोजगार नवीन तंत्रज्ञानावर आधारित असतात. अमेरिकन सरकारने नवीन तंत्रज्ञानाच्या विकासाला व्यापक आर्थिक अधिष्ठान दिले, केवळ याच कारणामुळे आज अमेरिकेचा जागतिक अर्थव्यवस्थेत मोठा दबदबा आहे. उदाहरणार्थ, इंटरनेटचा शोध अमेरिकन वाणिज्य विभागाने दिलेल्या अनुदानामुळे शक्य झाला होता. दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी अमेरिकन सेनेद्वारा अणुऊर्जेचा शोध लावण्यात आला होता. मात्र, आमच्या देशात सरकार अनुदान त्या लोकांना देते जे नवीन तंत्रज्ञानाच्या निर्मितीला अटकाव करतात. काही दिवसांपूर्वी एका सेवानिवृत्त प्राध्यापकाशी चर्चा झाली. मी त्यांना विचारले, आपला वेळ कसा जातो? ते म्हणाले, मला गेल्या 40 वर्षांपासून ‘काहीही न करण्याची’ सवय आहे. त्यांना दरमहा दीड लाख रुपये वेतन मिळत असेल.
 
जर कुणी वैज्ञानिक/शास्त्रज्ञ जर कुठल्या क्षेत्रात नवीन संशोधन कार्य करू इच्छित असेल, तर संपूर्ण व्यवस्था त्याला विरोध करते, असे हे शास्त्रज्ञ सांगतात. कारण जर एखाद्या वैज्ञानिकाने नवीन शोध लावला तर बाकी सर्व शिथिल पडलेल्या वैज्ञानिकांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येते. जर सर्व वैज्ञानिकांनी काम केले नाही, तर कुणालाही काही समस्या असण्याचे कारण नाही. मात्र, 100 पैकी जर दोन काम करीत असतील तर 98 जणांच्या नोकर्‍या धोक्यात येतात. यामुळे आमचे सरकार त्या 98 लोकांच्या हिताचे रक्षण करते जे तांत्रिक संशोधन होऊ देत नाहीत. यामुळेच देशात एवढ्या स्वस्त किमतीत उच्च दर्जाचे वैज्ञानिक उपलब्ध असूनही आम्ही तांत्रिक शोधात मागे आहोत. भारतीय वैज्ञानिक अमेरिकेत जाऊन चांगले कार्य करतात आणि आमच्या देशात आमचेच सरकार त्यांना चांगले काम करण्यापासून अटकाव करते.
 
दुसर्‍यांदा निवडून आलेल्या रालोआ सरकारने संपूर्ण देशात वायफायचे जाळे पसरविण्याचा निर्णय घेतला आहे. हे योग्य दिशेने टाकलेले पाऊल आहे. मात्र, शिक्षणव्यवस्थेत सुधारणा झाल्यासच रोजगारनिर्मिती शक्य आहे. सरकारला शिक्षणक्षेत्रात सुधारणा करण्यासाठी काही गोष्टींवर निश्चितपणे विचार करावा लागेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यापीठात राजकीय दबावामुळे कुलगुरूंच्या नियुक्त्यांना अटकाव केला पाहिजे. सरकार एखाद्या विशिष्ट विचारसरणीचे असते आणि आपल्या विचारसरणीला अनुकूल लोकांची नियुक्ती करण्याचा सरकारला अधिकार आहे. मात्र, आपल्या विचारसरणीच्या पण कार्यक्षम नसलेल्या लोकांची नियुक्ती करणे योग्य नाही. आमची संपूर्ण शिक्षणव्यवस्था वैचारिक भ्रष्टाचारामुळे आतून पोखरली गेली आहे. त्यामुळे सरकारने प्रथम सक्षम लोकांना एकत्रित केले पाहिजे. त्याची आज सर्वाधिक गरज आहे. केवळ सक्षमतेच्या आधारावरच सरकारने नियुक्त्या केल्या पाहिजेत.
 
तसेच दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे सरकारने सर्व विद्यापीठे आणि वैज्ञानिक संस्थांमध्ये प्राध्यापक आणि वैज्ञानिकांना स्थायी नोकरी देण्याऐवजी पाच वर्षांच्या करारावर ठेवले पाहिजे. मी फ्लोरिडा विद्यापीठात शिकत होतो. आमच्या 40 पैकी केवळ दोन प्राध्यापकांना स्थायी नियुक्ती देण्यात आली होती. बाकी सर्व प्राध्यापकांचे पाच वर्षे मूल्यांकन होत होते आणि त्याच आधारावर कराराचे नूतनीकरण होत होते. मूल्यांकनात विद्यार्थी, एक बाहेरची संस्था आणि आपलेच सहकारी या तिघांचा सहभाग असायला हवा. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे शैक्षणिक संस्थांना दिलेली रक्कम त्यांनी केलेल्या कार्यावरच आधारित हवी. आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये प्राध्यापकांचे किती शोधनिबंध, पत्रिका प्रकाशित झाल्या, सेल्फ फायनान्सिंग अभ्यासक्रमाच्या माध्यमातून किती रक्कम गोळा केली, इत्यादी बाबी तपासूनच या संस्थांना अर्थपुरवठा करण्यात यावा. हे उपाय योजून नवे सरकार भारतात उच्च दर्जाच्या रोजगारांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करू शकेल आणि प्रत्यक्षात भारत महाशक्ती म्हणूनही उदयास येऊ शकेल.