दिलखुलास रिजिजू

    दिनांक :09-Jun-2019
मिलिंद महाजन
 
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत माजी क्रीडा मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड जयपूर ग्रामीण क्षेत्रातून निवडून आले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या सत्तापर्वात राठोड यांच्याकडेच क्रीडा खाते कायम राहण्याची आशा होती. परंतु यंदाच्या मंत्रिमंडळात राठोड यांची वर्णी लागली नाही आणि माजी गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे क्रीडा खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली. राज्यवर्धनसिंह राठोड यांच्याप्रमाणे किरेन रिजिजूसुद्धा तेवढेच उत्साही मंत्री आहे. क्रीडामंत्रीपदाची सूत्रे आपल्या हाती घेतल्यानंतर आल्या-आल्याच त्यांनी आपल्या कामचा धडाका सुरु केला. भारतीय खेळाडूंशी तसेच राष्ट्रीय क्रीडा महासंघाच्या पदाधिकार्‍यांशी भेटीगाठी, क्रीडासुविधांची पाहणी दौरा व प्रशासनिक अधिकार्‍यांसोबत बैठकी घेतल्या. 
 
 
रिजिजू यांनी सर्वप्रथम इम्फाळमधील प्रस्तावित राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या आराखड्याला मंजुरी देण्याचे काम केले. गतवर्षी मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या क्रीडा विद्यापीठाची कोनशिला समारंभात पायाभरणी केली होती. भूविकासाच्या समस्येमुळे प्रकल्पाला विलंब झाला, परंतु आता प्रकल्प उभारणीच्या कार्याला लगेच सुरुवात करा, असे आदेशही त्यांनी दिले.
 
क्रीडा क्षेत्राला सरकारकडून पूर्ण सहकार्य मिळेल आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघाच्या स्वायत्तेत मंत्रालयाचा कोणताही हस्तक्षेप राहणार नाही. मात्र राष्ट्रीय क्रीडा महासंघ आणि सरकार यांच्यात समन्वय असण्याची गरज आहे, जेणेकरून खेळाडू व प्रशिक्षकांच्या समस्या योग्यरीत्या हाताळता येईल, असे त्यांनी महासंघाच्या पदाधिकार्‍यांशी बोलताना स्पष्ट केले.
 
यापूर्वीचे क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांच्या सुप्त संकल्पनेतून साकारलेला खेलो इंडिया हा प्रकल्प यापुढेही कायम राहील. पंतप्रधानांचा खेलो इंडिया हा प्रकल्प इतर कोणत्याही योजनेपेक्षा अधिक लोकप्रिय आहे. आज प्रत्येक जण म्हणतोय खेलो इंडिया. आता खेलो इंडियाला देशातील प्रत्येक कानाकोपर्‍यात पोहोचविणे, माझे कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले.
 
पुढील चार ते आठ वर्षात अर्थात आतापासून तीन ऑलिम्पिकपर्यंत आम्ही क्रीडा क्षेत्रात आमूलाग्र सुधारणा करू. ही सुधारणा केवळ नाममात्र राहणार नाही, तर त्याची प्रचिती विविध स्पर्धेत भारताच्या वाढत्या पदकसंख्येवरून येईल, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.
 
भुतकाळातील चांगल्या गोष्टी आणि नवीन गोष्टींची जोडल्या पाहिजेत. गावखेड्यातल्या पारंपरिक खेळ आणि आधुनिक ऑलिम्पिक क्रीडा प्रकारात समान लक्ष आणि सहकार्य करण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले. ऑलिम्पिक हे जागतिक क्रीडा स्पर्धेची सर्वोच्च स्पर्धा आहे, यासोबतच आशियाड, राष्ट्रकुल, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा व इतर मोठ्या स्पर्धांनासुद्धा समान महत्त्व आहे.
 
युवा कल्याण व क्रीडा खाते हे सरकारमधील अतिशय महत्त्वाचे खाते आहे. या माध्यमातून आपण देशातील युवकांमध्ये चैतन्य निर्माण करू शकतो, कारण तेच देशाचे शक्तीस्थान आहे. हे अतिशय सौम्य खाते असून देशाच्या तरूणांना योगदान देण्यासाठी युवक कल्याण व क्रीडा खाते उत्सुक आहे. हे सर्व कार्ये एकटा क्रीडा मंत्री करू शकणार नाही, तर याकरिता सर्वांची साथ मिळणे आवश्यक आहे. अर्थात सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हे मोदी सरकारचे तत्व आहे. सांघिक प्रयत्नांमधूनच हे साध्य होईल आणि हेच कुठल्याही यशाचे रहस्य/सार आहे.
7276377318