महाराष्ट्राचा मानबिंदू हारावत!

    दिनांक :09-Jun-2019
यादव तरटे पाटील
वन्यजीव अभ्यासक, दिशा फाउंडेशन, अमरावती.
9730900500
www.yadavtartepatil.com
 
ब्रह्ममुहूर्तावर उठायचं ब्रह्मकर्तव्य पार पाडण्याचं भाग्य बालपणीच मला वारसाहक्कानेच मिळालं. पहाटेच आंघोळ आटोपली की, बाबांचं बोट धरून शेतात जाणे हा नित्यनियम ठरलेलाच. शिवारफेरीत एकीकडे सूर्योदय, तर दुसरीकडे पक्ष्यांची किलबिल कानी पडायची. अनेक पक्षी दिसायचे, पण त्यांचे नाव माहिती नव्हते. बहुतेक वेळा बाबा स्थानिक नाव सांगायचे. मात्र, चौथीनंतर गाव आणि शिवार सुटलं ते कायमचंच! मग माझी भेट थेट उन्हाळ्याच्या सुट्‌ट्यांमध्येच व्हायची. शालेय शिक्षणानंतर अमरावतीला महाविद्यालयीन शिक्षणासाठी स्थानांतरण करण्यात आलं. पदवी संपादन केल्यानंतर पुढे स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू झाली. 

 
 
पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मुलाखतीच्या आवेदनपत्रात ‘छंद’ शब्दाशी गाठ पडली. खरंतर निसर्ग हा निसर्गमित्रांची बरोबर व्यवस्था करतो. शेजारी डॉ. जयंत वडतकर राहायचे. डॉ. जयंत आणि डॉ. राजू कसंबे हे नियमित पक्षिनिरीक्षण करायचे. मी त्यांच्याशी चर्चा केली. मुलखतीला पुरेसा वेळ होताच. चर्चेअंती आवेदनपत्रात मी छंदाच्या रकान्यात ‘पक्षिनिरीक्षण’ टाकून दिलं. तो रकाना भरताना आयुष्याचा रकानासुद्धा नेहमीकरिता भरला जाईल, असे वाटले नव्हते. बालपणी नीलपंख आणि तारुण्यात हारावत, या उभयतांनी माझ्या आयुष्याचं सोन केलं. वागण्याला आणि जगण्याला एक वेगळी दिशा दिली.
 
पक्षी हे उत्तम बीजप्रसारक, निसर्गाचे सफाई कामगार, शेतकर्‍यांचे मित्र, पर्यावरणातील महत्त्वपूर्ण घटक, अशी त्यांची ओळख आहे. पर्यावरणसंतुलनात पक्ष्यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. अन्नसाखळी आणि अन्नजाळ्यातील पक्षी हा एक महत्त्वाचा घटक आहे. पक्षी सामान्य माणसाच्या आकर्षणाचा विषय असला, तरीही पक्ष्यांचा अधिवास, त्यांना असणारे संभाव्य धोके, त्यांचा विस्तार व स्थलांतर, बदलत्या ऋतूप्रमाणे होणारे बदल, पक्षिप्रजातींवर मानवी विकासाचा होणारा परिणाम... असे अनेक प्रश्न माझ्या मनात घर करून आहेत.
 
पक्षिनिरीक्षण हा तसाही एक आनंददायी छंद आहे. वेळ मिळेल तसे किंवा वेळ काढून तलावांवर, माळरानांवर किंवा जंगलात फिरणे, तेथील पक्षी पाहून त्यांची ओळख पटवणे, त्यांच्या नोंदी घेणे, नवनवीन ठिकाणी जाऊन नवनवीन प्रजाती शोधणे, आपल्याकडील पक्ष्यांच्या यादीत भर टाकत राहणे आणि त्यातून आनंद घेत राहणे म्हणजे पक्षिनिरीक्षण होय. वरील सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यात गुंग असताना एक दिवस सकाळीच, अमरावती विद्यापीठ परिसरात आम्ही फिरत होतो. फिरताना अचानक कडूिंलबाच्या झाडावर काही पक्ष्यांचा थवा बसलेला दिसला. ती रुबाबदार आकृती आणि पोपटी हिरवा गुबगुबीत पक्षी पाहून मन प्रसन्न झालं. कारण तो महाराष्ट्राचा मानबिंदू म्हणजेच आपला राज्य पक्षी हारावत होता!
 
हारावत पक्ष्याला मराठीत हरोळी, हिंदी भाषेत हरियाल आणि पिवळ्या पायांचे हिरवं कबुत्तर असेही म्हणतात. हरोळी पक्ष्याचे शास्त्रीय नाव ट्रेरॉन फोईनोकोप्तेरा आहे. कबुतरवंशीय पक्षी असलेल्या हरोळीला अनेक धोके आहेत. वाढती शिकार आणि वड, पिंपळ यांसारख्या मोठ्या वृक्षांच्या कत्तली याच्या जिवावर बेतत आहेत. हा पक्षी दुर्मिळ होत आहे. मात्र, आययुसीएनच्या लाल यादीत याचा समावेश नाही. हारावत पक्ष्याला पाचूकवडा नावानेसुद्धा ओळखले जाते. हारावतच्या अंगावरील पाचूसारखी हिरवी झांक व पिवळ्या, निळ्या आणि जांभळ्या अशा कितीतरी रंगांच्या छटा आपल्याला मोहात पाडतात.
 
गर्द हिरव्या झाडांची ठिकाणे, प्रामुख्याने वड, पिंपळ, उंबर, अंजीर जातीची झाडे ही त्यांची आवडीची जागा आहे. हे पक्षी जोडीने आणि बहुदा थव्यानेच उडतात. हरियाल सकाळच्या कोवळ्या उन्हात हमखास दिसतात. या पक्ष्याला विहारासाठी सकाळ अधिक आवडते. मार्च ते जून या कालावधीत त्यांचा विणीचा हंगाम येतो. या काळात उंच झाडावरच्या, काड्यांनी बनलेल्या घरट्यात हे पक्षी अंडी घालतात. मध्य भारतापासून ते थेट उत्तरेकडील सर्व राज्यांत यांचा वावर आहे. हा पक्षी महाराष्ट्र, गुजरात, बंगाल, राजस्थान, पंजाब, आसामसह सर्वत्र आढळतो. वृक्षतोडीमुळे हरियाल पक्षी आपली मूळची वास्तव्याची ठिकाणे सोडून नवीन जागा शोधताना दिसतात.
 
विकासकामांच्या नावाखाली मोठमोठाले वृक्ष तोडल्यामुळे यांना धोका उत्पन्न झाला आहे. आजवर एकूण 3 महा जैवविविधता केंद्र म्हणून मान्यता पावलेल्या आपल्या भारतातील पक्षिवैविध्यही संपन्न आहे. जगभरात पक्ष्यांच्या साडेदहा हजारांहून अधिक प्रजाती असून, त्यांपैकी 12 टक्के भारतात आढळतात. भारतातील एकूण 1284 प्रजातीच्या पक्ष्यांमध्ये अनेक सुंदर पक्षी आहेत. मात्र, मला हारावत अधिक भावतो. पिवळ्या पायांच्या हिरव्या कबुतराने माझं अख्खं आयुष्य पालटून जाईल, असं कधीही वाटलं नव्हतं. हरोळी आणि नीलपंख पक्ष्याच्या दर्शनाने बालपण व्यतीत करताना, माझ्या मुलाखतीच्या निमित्ताने सुरू झालेले पक्षिनिरीक्षण आता मला आवडायला लागले होते.
 
हळूहळू पक्षिनिरीक्षण करताना जंगल आणि तेथील जैवविविधता माझा जिवलगांचा गोतावळा होईल, असेही वाटले नव्हते. वाघ व पक्षी शिकारविरोधी मोहिमेत जीव धोक्यात घालून काम करेल, असंही वाटलं नव्हतं. मात्र, निसर्गाची ऊर्जा आणि त्याने दिलेल्या हिमतीच्या जोरावर काहीही शक्य आहे, याची प्रचीती आपल्याला आल्याशिवाय राहात नाही. म्हणूनच आज अनेक संकटांचा सामना करत जगणार्‍या हरोळी पक्ष्यांचे संवर्धन करणे क्रमप्राप्त आहे. हिरवा रंग असलेल्या हरोळी पक्ष्याचा भविष्यात शिकारीने लाल रंग होणार नाही, याची आपण काळजी घेऊ या. आपल्या राज्यपक्ष्याला वाचविणे हे केवळ आपले कर्तव्यच नसून आपल्या अस्तित्वाच्या दृष्टीनेसुद्धा महत्त्वाचे आहे. चला तर मग, आपल्या हारावतांना अभय देऊ या...