प्रश्नपत्रिका 'लीक' करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

    दिनांक :09-Jun-2019
अमरावती विद्यापीठा पेपर फूट प्रकरण
 
अमरावती: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेचा पेपर फुटल्या प्रकरणी रविवारी दोघांविरुद्ध फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आशिष राऊत (रा. बोर्डी तालुका अकोट. जिल्हा अकोला) आणि ज्ञानेश्वर बोरे( रा. उकडी तालुका मेहकर, जिल्हा बुलडाणा) अशी दोन आरोपींची नावे आहेत.
 

 
 
अभियांत्रिकी शाखेचा मॅकेनिक्स विषयाचा पेपर २७ मे रोजी सकाळी नऊ वाजता होता. मात्र, त्याचदिवशी सकाळी सुमारे सव्वा आठ वाजता सदर विषयाची प्रश्नपत्रिका व्हाट्सअप्पच्या माध्यमातून सर्वत्र पसरली होती. ही प्रश्नपत्रिका वाशीम येथील संमती महाविद्यालाच्या परीक्षा केंद्रावरून डाऊनलोड झाल्याचे तपासात स्पष्ट झाले होते.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या प्रकरणाची तक्रार पोलिसात द्यावी, अशी मागणी केली होती. अधिसभेनेही हे प्रकरण पोलिसात द्यावे, अशी चार जूनला मागणीही केली होती. कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी विद्यापीठाच्या चौकशी समितीचे काम पूर्ण होताच आठ दिवसात पोलिसात तक्रार देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार शनिवारी सायंकाळी परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. हेमंत देशमुख यांनी या प्रकरणाची तक्रार फ्रेजरपुरा पोलिसांकडे दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक लेवाटकर या प्रकरणाची चौकशी करीत आहे.
 
प्रश्नपत्रिका वितरण पध्दत
विद्यापीठ प्रशासन विभागातील सर्व संबंधित परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पाठवते. त्या परीक्षाकेंद्राचे प्रमुख हे महाविद्यालयाचे प्राचार्य असतात. परीक्षेच्या 10 मिनिटांपूर्वी प्राचार्यांच्या ईमेलवर आलेली प्रश्नपत्रिका डाऊनलोड केली जाते. त्यानंतर प्रश्नपत्रिकेच्या झेरॉक्स काढून परीक्षार्थींना वितरित केल्या जातात.