#ICCWorldCup2019 : इंग्लंडची बांगलादेशवर १०६ धावांनी मात

    दिनांक :09-Jun-2019

कार्डिफ,
येथे झालेल्या सामन्यात यजमान इंग्लंडने बांगलादेशवर १०६ धावांनी मात करत आपला दुसरा विजय मिळवला. बांग्लादेश कडुन शाकीब अल हसनने १२१ धावांची खेळी करत संघाला विजयापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न असफल ठरला. बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चरने ३ बळी घेत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. 

 
त्याआधी, सलामीवीर जेसन रॉयचे धडाकेबाज शतक आणि त्याला जॉनी बेअरस्टो, जोस बटलर यांनी दिलेल्या भक्कम साथीच्या जोरावर इंग्लंडने ३८६ धावांचा डोंगर उभा केला. जेसन रॉयने १२१ चेंडूत १५३ धावांची खेळी केली. बांगलादेशकडून मोहम्मद सैफुद्दीन आणि मेहदी हसन यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. त्यांना मश्रफी मोर्ताझा आणि मुस्तफिजुर रेहमानने प्रत्येकी १-१ बळी घेत चांगली साथ दिली.
दरम्यान, नाणेफेक जिंकून सर्वात प्रथम गोलंदाजी करण्याचा बांगलादेशच्या कर्णधाराचा निर्णय पुरता चुकला. इंग्लंडच्या सलामीच्या फलंदाजांनी बांगलादेशच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो जोडीने पहिल्या विकेटसाठी १२८ धावांची भागीदारी केली. मश्रफी मोर्ताझाच्या गोलंदाजीवर बेअरस्टो आपलं अर्धशतक झळकावून माघारी परतला. यानंतर रॉयने जो रुटच्या साथीने डाव सावरत आपलं शतक साजरं केलं. आपलं दीड शतक झळकावल्यानंतर रॉय मेहदी हसनच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात माघारी परतला.
जो रुट माघारी परतल्यानंतर मैदानात आलेल्या जोस बटलर आणि कर्णधार इयॉन मॉर्गन यांनीही फटकेबाजी करत संघाला ३०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. जोस बटलरने बांगलादेशी गोलंदाजांचा समाचार घेत आपलं अर्धशतक झळकावलं. दोघेही फलंदाज आपापली जबाबदारी पूर्ण करुन बाद झाले. यानंतर इंग्लडच्या अखेरच्या फळीतल्या फलंदाजांनी फटकेबाजी करत संघाला ३८६ धावांचा टप्पा गाठून दिला.