हवाई दलाच्या बेपत्ता विमानाची माहिती देणार्‍यास पाच लाखांचे बक्षीस

    दिनांक :09-Jun-2019
सोमवारपासून बेपत्ता
 
नवी दिल्ली: हवाई दलाने एएन-32 या विमानाची माहिती देणार्‍यास बक्षीस जाहीर केले आहे. विमानाची माहिती देणार्‍याला पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. संरक्षण दलाचे जनसंपर्क अधिकारी विंग कमांडर रत्नाकरिंसह यांनी ही माहिती दिली आहे. या विमानात आठ कर्मचारी आणि पाच जवान होते.
हवाई दलाचे एएन-32 विमान सोमवारी दुपारी बेपत्ता झाले. हे विमान दुपारी 12 वाजून 25 मिनिटांनी जोरहाटहून निघाले होते. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. या विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटताच हवाई दलाने विमानाचा शोध सर्वत्र सुरू केला आहे. मात्र, अद्याप या बेपत्ता विमानाचा शोध लागलेला नाही. दरम्यान, विमानाचा शोध घेण्यासाठी हवाई दलाने सर्व उपलब्ध यंत्रणा कामाला लावल्या आहेत.

 
कोसळलेले पाचवे विमान
यापूर्वी याच श्रेणीतील आणखी चार विमाने अशीच कोसळली होती. रशियाहून पाठवण्यात आलेले पहिले विमान मार्च 1986मध्ये कोसळले होते. या विमानातील सातही जणांचा पत्ता लागला नव्हता. चार वर्षांनी केरळच्या पोनमुडी गावाजवळ दुसरे विमान कोसळले. तिसर्‍या घटनेत, जून 2009मध्ये अरुणाचल प्रदेशात विमान कोसळून 13 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या श्रेणीच्या विमानांमध्ये सुधारणा करण्यात आल्या. त्यानंतरही 12 जुलै 2016 रोजी चेन्नईहून पोर्ट ब्लेअरला निघालेले विमान बेपत्ता झाले. त्याचा शोध अद्याही लागलेला नाही.