पाकिस्तानात अल्पवयीन हिंदू मुलीवर सामूहिक बलात्कार

    दिनांक :09-Jun-2019
पाकिस्तान : पाकिस्तानात हिंदू अल्पसंख्यकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या होणाऱ्या एकामागून एक घटना समोर येत असतांनाच आणखी एक घृणास्पद प्रकार समोर आला आहे. येथील सिंध प्रांतात एका १३ वर्षीय अल्पवयीन हिंदू मुलीवर दोन जणांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना अटक केल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
 
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ७ जून रोजी सिंध प्रांताच्या तांडो मोहम्मद खान जिल्ह्यात ही घटना घडली. पीडित मुलगी किराणा खरेदी करण्यासाठी बाहेर गेली होती. त्यावेळी दोन जणांनी तिला बोलावून बळजबरी दारु पिण्यास सांगितले, तिने नकार दिल्यानंतरही तिला जबरदस्ती करुन दारु पाजण्यात आली. त्यानंतर तिला निर्जन ठिकाणी घेऊन गेले आणि तिच्यावर बलात्कार केला.
बराच वेळ झाल्यानंतरही मुलगी न आल्याने अखेर तिच्या वडिलांनी आणि भावाने शोधाशोध सुरू केली. तिचा शोध घेतला असता ती एका साखर कारखान्याजवळील एका मैदानात बेशुद्धावस्थेत आढळली. त्यानंतर पीडित मुलीला जवळील रुग्णालयात दाखल करुन पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी चौकशीनंतर दोन आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, पीडित मुलीला न्याय मिळेल असे आश्वासन सिंध प्रांतांच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार मुर्तझा वहाब यांनी दिले आहे.