नौदलातील सर्वात जुन्या पाणबुडीला नवे रूप

    दिनांक :09-Jun-2019
मुंबई: नौदलाच्या ताफ्यात असलेल्या ‘आयएनएस शिशुमार’ या सर्वात जुन्या पाणबुडीला आता नवे रूप येणार आहे. या पाणबुडीची कालमर्यादा वाढवण्यासाठी तिच्या डागडुजीचे काम सध्या माझगाव गोदीमध्ये सुरू आहे. ही डागडुजी पुढील दोन वर्षे चालणार असल्याची माहिती संबंधित सूत्रांनी दिली आहे.
‘आयएनएस शिशुमार’ ही मूळ जर्मन बनावटीची पाणबुडी 1986च्या दरम्यान नौदलाच्या ताफ्यात आली. सध्या नौदलात कार्यरत असलेली ही सर्वात जुनी पाणबुडी आहे.
 

 
 
 सूत्रांनुसार, माझगाव गोदीने जर्मनीच्या थायसेनक्रूप मरीन सिस्टीम्स या कंपनीच्या सहकार्याने हे काम सुरू केले आहे. नौदलाने सुमारे 981 कोटींचे हे कंत्राट माझगाव गोदीला दिले आहे. या डागडुजीनंतर आयएनएस शिशुमारची कालमर्यादा सुमारे 20 वर्षांनी वाढणार आहे. 2011पर्यंत ही पाणबुडी नवीन रूपात नौदलाला सुपूर्द करायची आहे.
या डागडुजीअंतर्गत प्रामुख्याने पाणबुडीचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. ही डिझेल-इलेक्ट्रिक इंजिन प्रणालीवर चालणारी जुन्या तंत्रज्ञानाची पाणबुडी आहे. त्यामुळे या पाणबुडीचा पल्ला तुलनेने कमी आहे. सध्या ही पाणबुडी सुमारे 850 फूट खोलवर जाऊन ताशी 15 किमी वेगाने कमाल 15 हजार किमीचा प्रवास करू शकते. आता या डागडुजीअंतर्गत वेग वाढवल्यानंतर पल्ला कमी होऊ नये, यासाठी प्रयत्न होणार आहेत. त्यासाठी या पाणबुडीला ‘एआयपी’ या अत्याधुनिक प्रणालीने सज्ज करण्याचा प्रयत्न असेल. या तंत्रज्ञानाद्वारे पाणबुड्या तुलनेने अधिक काळ पाण्यासाठी राहू शकतात, अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली.