डांगचिग, डगांगऽऽ जितलो ना!

    दिनांक :09-Jun-2019
मौेके पे चौका!
- कौतिकराव
गेल्या हप्त्यात डायीचे भाव वहाडले. 100 रुपे किलोच्या वर गेली तुरीची डाय. गॅस सिलींडरबी महाग झाला. आता पेट्रोल अखीन वहाडनार हाय... याचं बाकी टायमाले काही वाटलं असतं. पन आता काहीच वाटत नाही, याच कारन हाय का किरकेट चा वल्ड कप सुरू हाय. किरकेट हे मोठी भुल हाय. ऑपरेसन करताना सुंगनी देतेत ना? तसंच हे किरकेटची सुंगनी हाय. त्याच्यापायी सार्‍याच आपल्या समस्या काहीच वाटत नाही. आधीच्या कायी लोक पुस्तक वाचाचे न त्यात सारं इसराचे. आता किरकेटमंध विसरतेत. आता पहाना नेपोलियननं ग‘ीक वर हल्ला केला. तिथं मोठ मोठे वाचनालयं होते. ग्रीक लोक मॅटासारखे वाचाचे. नेपोलियनच्या सैनिकायले हे अ‘गच वाटलं. आंबटशौकच वाटला वाचन हा.
 

 
 
त त्याहिनं आपलं आंघोयीचं पानी गरम कर्‍याले पुस्तकं चुलीत जायाले सुरूवात केली. त त्याहिले नेपोलियन म्हने, अबे मॅटहो हे काय करून राह्यले? (असं नेपोलियन त्याच्याच भासेत म्हनला. मी आपला तुमाले समजाव म्हून आपल्या भासेत सांगत हावो. नाहीत तुमी समजान का नेपोलियनले वर्‍हाडी येत होतं.) त तो म्हने असं नोका करू... सैनिक म्हने, कामून नाही कर्‍याचं? त नेपोलियन म्हने, तुमाले राजकारन नाही समजत का? त्यायच्या हातचे पुस्तक गेले त थे इचार करतीन. डोस्के मोकये तोीन ना त्याहिचे... मंग थे आपल्याले इरोध करतीन. आता थे पुस्तकं वाचत हायत त त्याहिले आपन हल्ला करून त्याहिले गुलाम केलं हेबी नाही समजत हाय...
 
ते समजलं ना का याच्या मांगचा अर्थ? जसं ग‘ीक लोकायच्या वाचनाचं, तसंच आपलं हे किरकेटचं हाय. त्याच्यापायी सुंगनी देल्लवानी होते न आपल्याले काहीच समजत नाही. मंग डायीचे भाव वहाडले तबी काहीच वाटत नाही. आपल्या देसात पायडल रीक्षा चालवनाराबी रीकाम्या पोटानं दुकानाच्या काचेतून टिव्हीवर मॅच पाह्यते न भूक इसरते. भारत मॅच जितला त त्याले अनंद होते. आपले लेकरंबी उपास्या पोटीच घरी हायत हेबी त्याच्या ध्यानात येत नाही... त किरकेट याच्याचसाटी असते. तुमी सगळं इसराचं. तुमाले पानी नाही भेटत न किरकेटचे खिलाडू कोल्ड ड्रींकच्या जाहिराती करतेत...
 
तरीबी आता टीम कोहली आपली पहिली मॅच जितली हाय. एकदम दक्षिण आफ्रिकेच्या टीमलेच आपन हरवलं. मॅच जितत असताना आमच्या बंड्याले त इतला अनंद झाला का त्यानं टिव्हीचाच मुका घेतला. त्यानं मुका घ्याले गेला तवा टिव्हीवर रोहित शर्मा होता. मातर त्यानं टिव्ही स्कि‘नले होट टेकवले अन्‌ त्याच्यावर एक बाई आली. त बंड्याची बायको नावापरमान अजिबात शांत नसलेली शांरा म्हने, तुमाले काही लाजा- शर्मा नाही का?
 
त त्या दिसी रोहीतपायी आपून जितलो. त्या चहल पायी जरा चहल पहल होती आपली. आता सुरुवात त चांगली झाली हाय. हे मॅच आपन जिताव म्हून अनेक लोकायनं पूजा केली, यज्ञ केले. आता पाऊस येत नाही हाय. उसिरा येनार हाय. त्याच्यासाटी कोनाले पूजा, प्रार्थना नाही कराव वाटत, पन घरांत पानी नसतानी बिनापान्याची हजामत करून लोक मॅच पहाले टिव्ही समोर बसतेत. त्याच्यासाठी कनेक्शन पाह्यजे. लाईन पाह्यजे. बाकी काही नसलं त चालते...
त मंडयी, आता पह्यलंम्‌ प्यारा म्हनत आपन मॅच जितलो हाव. त पुढच्या मॅचले शुभेच्छा देऊ... बाकी यंदा धोनी न विराट, रोहित यायलेच पाहून घ्याचं हाय. मी काही खेलाले जावू सकनार नाही. माह्या दोन एक्कर शेतीचे यंदा लय कामं हाय!
- कौतिकराव
------