दारू तस्करीत अडकला नागपूरचा वाहतूक शिपाई

    दिनांक :09-Jun-2019
 
 
 

 
 
 
वरोडा: नागपूर शहराच्या वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या एका वाहतूक शिपायासह त्याच्या सहकारी मित्रास वरोडा पोलिसांनी अवैध दारू तस्करीत रंगेहाथ अटक केली. त्यांच्याकडून वाहनासह 9 लाख 35 हजार रुपयांचा दारूसाठा जप्त केला. ही कारवाई रविवार, 9 जून रोजी पहाटेच्या सुमारास वरोडा पोलिसांनी केली.
मूळचा भद्रावती येथील असलेला सचिन विनायक हांडे हा नागपूर येथील सीताबर्डी पोलिस ठाण्यातील वाहतूक शाखेत कार्यरत आहे. सचिन हांडे व सहकारी प्रणव म्हैसकर हे दोघेही रविवारी पहाटेच्या सुमारास ईयू-4873 या क्रमांकाच्या वाहनाने भद्रावतीकडे जात होते. या वाहनातून दारूसाठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे वाहनाचा पाठलाग करून नंदोरी येथे टोल नाक्याजवळ वाहन अडविले. वाहनाची तपासणी केली असता, वाहनात 4 लाख रुपये किमतीची विदेशी दारू आढळून आली. दारूसाठ्यासह वाहन असा एकूण 9 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला.
ही कारवाई वरोड्याचे ठाणेदार उमेश पाटील यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक अमोल मांडवे, धनराज करकाडे, श्रीकांत नागोसे, निखिल कौरासे, मंगेश शेंडे आदींनी केली.