मोदींनी श्रीलंकेत स्फोटातील मृतांना वाहिली श्रद्धांजली

    दिनांक :09-Jun-2019
नवी दिल्ली,
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मालदीववरून श्रीलंकेला पोहोचले आहेत. कोलंबो विमानतळावर श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधान मोदी श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहे. तसेच माजी राष्ट्रपती आणि विरोधी पक्षाचे नेते महिंदा राजपक्षे यांचीही ते भेट घेणार आहे. 

 
अँटनी चर्चमध्ये वाहिली श्रद्धांजली
श्रीलंकेत पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी कोलंबोतील सेंट अँटनी चर्चला भेट देत एप्रिल महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. श्रीलंकेतील दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंकेच्या दौऱ्यावर आलेले पंतप्रधान मोदी हे पहिलेच परदेशी नेते आहेत.
 
 
नरेंद्र मोदी यांच्या श्रीलंका दौऱ्यादरम्यान, २ महिन्याआधी श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्यामुळे श्रीलंकेसहित इतर सर्व देश हादरले होते. याच पार्श्वभूमीवर द्विपक्षीय चर्चेत दहशतवादाशी संबंधित मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करणार आहेत.
 
मालदीव आणि श्रीलंका या दोन देशांचा दौरा हा भारतासाठी 'नेबरहूड फर्स्ट' ही नीती महत्वपूर्ण असल्याचे दर्शवत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी या पूर्वीच म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शपथविधी सोहळ्यालाही श्रीलंका आणि मालदीव या देशांच्या प्रमुखांना बोलावले होते.