भरधाव ट्रॉली उलटून १७ मजूर जखमी

    दिनांक :01-Jul-2019
तभा ऑनलाईन टीम 
अचलपूर,
मेळघारातील हत्तीघाट येथील आदिवासी मजुरांना शेतात पेरणीसाठी नेत असलेला ट्रॅक्टर परतवाडा येथील अंजनगाव स्टॉपवर आला असता ट्रॉली पलटल्याने 17 मजूर जखमी झाले असून 3 गंभीर जखमी आहेत. मजुरांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. 
 
 
सोमवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास हत्तीघाट येथील 40 आदिवासी मजूर शेतीच्या कामाकरिता पांढरी येथे जात असतांना अंजनगाव स्टॉपवर ट्रॉली उलटली. जखमींमधील रूपी रामचंद्र काळे 25 बेलखेडा, नीला अशोक सावरकर 24 हत्तीघाट, पिंकी बावसकर 14 हत्तीघाट या महिला मजूर गंभीर जखमी असून उपजिल्हा रुग्णालयात आणले असता त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात अमरावती येथे पाठवण्यात आले आहे.
 
मेळघाटातील आदिवासी बांधव रोजगारासाठी परतवाडा व अचलपूर शहरासह तालुक्यात येत असतो. तालुक्यातील पांढरी येथील ट्रॅक्टर चालक नेहमीप्रमाणे ट्रालीत कोंबून बाहेर मजूर नेत होता. वेळेवर पोहचावे म्हणून भरधाव ट्रॅक्टर पळवीत असतांना अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
दोन दिवस आधी परतवाडा पोलिसांनी अवैध धंदे , अवैध वाहतूक, नागरिकांच्या सुरक्षा संर्दभात व्यापार्‍याची बैठक घेतली होती. त्यात प्रत्येक चौकात पोलिसांची ड्युटी राहील, तसेच अवैध प्रवासी वाहतुकीस आळा घातला जाईल, असे ठरले होते. पोलिसांनी लगेच अंमलबजावणी केली असती तर असा प्रसंग ओढवला नसता, असे नागरिकांचे म्हणणे आहे.