जंगलापूर येथे ८७ लक्ष वृक्षांची लागवड

    दिनांक :01-Jul-2019
 
आनंदी जगण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक : विवेक भिमनवार

 
 
तभा ऑनलाईन टीम  
वर्धा,
वनक्षेत्र जास्त असणाऱ्या देशांमध्ये हॅपिनेस इंडेक्स अर्थात आनंदी असण्याचे प्रमाण अधिक आढळून आले आहे. त्यामुळे आपल्या देशाचा हॅपिनेस इंडेक्स वाढविण्यासाठी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने वृक्ष लागवड आणि त्याचे संगोपन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केले.
 
33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जंगलापूर येथे वनमहोत्सव उदघाटन कार्यक्रम वृक्ष लागवडीने पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना आवाहन केले.  लोकसहभागामुळे 50 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम यशस्वी झाला आहे. काही वर्षांपूर्वी ग्लोबल वार्मिंग हा विषय केवळ चर्चासत्राचा होता. पण हा विषय इतक्या लवकर प्रत्यक्षात अनुभवावा लागेल असे वाटले नव्हते. ग्लोबल वार्मिंगमुळे प्रत्येक वर्षी आपण नैसर्गिक आपत्तीला सामोरे जातोय. यावर्षीचा उन्हाळा हा खूप तीव्र आणि दीर्घ स्वरूपाचा होता. महाराष्ट्रात ज्या गावांमध्ये वनक्षेत्र कमी आहे तिथेच पाण्याचे टँकर लागले होते. त्यामुळे वनक्षेत्र जास्त असेल तर पाणी सुद्धा जास्त राहील. राज्यात 33 टक्के वन पाहिजे, मात्र ते केवळ 20 टक्के आहे. जेव्हा ते 33 टक्के होईल तेव्हा दुष्काळ, ग्लोबल वार्मिंग सारख्या समस्या राहणार नाहीत. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने 10 झाडे तरी लावावीत. 
 
 
फिलिपाईन्स या देशाने 10 झाडे प्रत्येक विद्यार्थ्याने लावली तरच त्यांना पदवी प्रमाणपत्र दिल जात. आपल्याकडे ही शक्ती करण्याची गरज पडू नये. सक्ती पेक्षा स्वतःहून केलेले कोणतेही काम चांगले आणि कायमस्वरूपी होते. ग्लोबल वार्मिंगला थोपवण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक आहे. आपल्या जिल्ह्याला 87 लाख 52 हजार च उद्दिष्ट आहे आपण सर्व मिळून हे उद्दिष्ट पूर्ण करू अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
पृथ्वीवर जगण्यासाठी जे वातावरण आवश्यक आहे ते म्हणजे पाणी आणि ऑक्सिजन. या दोन्ही बाबी झाडांमुळे आपल्याला मिळतात. ही पृथ्वी पुढील पिढीसाठी जगण्यायोग्य राहावी यासाठी आता आपण काळजी घेतली पाहिजे. आज भूजल पातळी 80 फुटावरून 600 फुटापर्यंत खाली गेली आहे. पुढच्या 30 वर्षात काय परिस्थिती होईल हे सांगता येत नाही. हे थांबवायचं असेल तर प्रत्येकाने झाड लावून ते जगवावे असे आवाहन पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी केले.
 

 
 
सचिन ओंबासे यावेळी बोलताना म्हणाले, 87 लाखांपैकी 20 लाख वृक्ष लागवडीचा लक्ष्यांक जिल्हा परिषदेकडे आहे. लोकांचा सहभाग वाढविल्याशिवाय शासकीय योजना यशस्वी होत नाही असे जेव्हा दिसून आले तेव्हा जलयुक्त शिवार, स्वछता अभियान यासारख्या कार्यक्रमात शासनाने लोकसहभाग मिळविला आणि त्या योजना यशस्वी झाल्यात. वृक्ष लागवड सुद्धा आज लोकचळवळ झाली आहे. यावर्षी जिल्हा परिषद शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांने एक वृक्ष लावून त्याच संगोपन करायचं आहे असे सांगितले.
वृक्ष लागवड ही बाल संगोपणासारखी करावी
 
यावेळी वन विभागासोबतच वेगवेगळ्या 49 विभागांना उद्दिष्ट दिले आहे . वर्धा जिल्ह्यात स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार मोठं खूप चांगला आहे. वनविभागाच्या वतीने जनतेसाठी रोपे आपल्या दारी उपक्रम यावर्षी सुद्धा राबविण्यात येत आहे. या ठिकाणी लोकांना सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध होतील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी महाबळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवडीमध्ये सहभाग घेतला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. संदीप पेटारे यांनी केले तर आभार डी एन जोशी यांनी मानले.