भारताचा पराभव होऊच शकत नव्हता : वकार युनिस

    दिनांक :01-Jul-2019
नवी दिल्ली,
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात झालेल्या भारताच्या पराभवामुळे उपांत्य फेरीत जाण्याच्या पाकिस्तानचा मार्ग आणखी कठीण झाला आहे. भारताचा हा पराभव पाकिस्तानी क्रिकेट संघाचे चाहते आणि माजी क्रिकेटपटूंच्या पचनी पडलेला नसून पाकिस्तानचा माजी कर्णधार वकार युनिस याने ट्विटरवरून त्याबद्दल जाहीर प्रतिक्रिया दिली आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात झालेल्या भारताच्या पराभवाबरोबरच भारतीय क्रिकेटपटूंच्या खिलाडूवृत्तीवर शंका उपस्थित केली आहे. 

 
संतप्त झालेल्या वकारने ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'तुम्ही कोण आहात हे महत्त्वाचे नाही... तर, तुम्ही आयुष्यात काय करता यावरूनच तुम्ही कोण आहात हे ठरते. पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचतो किंवा नाही याची मला मुळीच चिंता नाही. मात्र, एक नक्की आहे... काही चॅम्पियन्सच्या खिलाडूवृत्तीची परीक्षा घेतली गेली आणि त्यात ते सपशेल अपयशी ठरले', असे वकारने म्हटले आहे.
 
 
माजी क्रिकेटपटू बासित अली आणि सिकंदर बख्त यांनी सामन्याआधीच भारतीय संघाबद्दल वक्तव्ये केली होती. पाकिस्तानी संघाला आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेबाहेर ठेवण्यासाठी भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पराभूत होऊ शकतो, असा आरोप त्यांनी केला होता. इंग्लंडचे आता १० गुण झाले आहेत, तर पाकिस्तान ९ गुणांसह उपांत्य फेरीत जाग बनविण्यासाठी प्रयत्नशील आहे. इंग्लंडचा पुढील सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे, तर पाकिस्तानचा मुकाबला बांगलादेशशी होणार आहे.
भारताच्या पराभवामुळे पाकची निराशा 
इंग्लंडने भारताचा पराभव केल्यामुळे त्यांचे १० गुण झाले असून इंग्लंड संघ एका गुणासह पाकिस्तानच्या पुढं निघून गेला आहे. फॉर्मात आलेला इंग्लंड पुढचा न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करेल यात शंका नाही. म्हणजेच ११ गुण असलेले न्यूझीलंड आणि भारत यांच्यासह पाकिस्तान किंवा बांगलादेश यांच्यातील एक संघ असे तीन संघ स्पर्धेत असणार आहेत. इंग्लंडचा भारताविरुद्ध पराभव झाला असता, तर इंग्लंडचे ८ गुण राहिले असते. तर इंग्लंड न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकला असता तरी, इंग्लंडचे १० गुण झाले असते. पाकिस्तानने एका संघावर मात केल्यास त्याच्या खात्यात ११ गुण झाले असते. थोडक्यात भारताचा पराभव झाल्याने पाकसाठी ही लढाई आणखी बिकट झाली आहे.