बँक लॉकर विमा पॉलिसीविषयी...

    दिनांक :01-Jul-2019
मौल्यवान वस्तू, महत्त्वाची कागदपत्रं साठवून ठेवण्याचा सर्वात सुरक्षित पर्याय म्हणून भारतीय आजही बँक लॉकरवर विश्वास टाकतात. सोन्याचे दागदागिने घरी ठेवण्यापेक्षा लॉकरमध्ये ठेवणं अधिक सुुरक्षित असलं तरी हा सर्वात सुरक्षित पर्याय ठरत नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवं. याचं कारण म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये बँकेवर दरोडा पडण्याच्या घटनांमध्ये झालेली वाढ. गेल्या पाच वर्षांमध्ये भारतीय बँकांनी दरोडा, चोरी अशा कारणांमुळे तब्बल 235 कोटी रुपये गमावल्याचं आकडेवारी सांगते. त्यामुळे कष्टाने कमावलेल्या पैशातून घेतलेल्या या मौल्यवान वस्तू बँक लॉकरमध्ये ठेवण्याआधी आपलं आर्थिक नुकसान होऊ नये, याची तजवीज करून ठेवायला हवी. 

 
 
बँक लॉकर विमा पॉलिसीच्या माध्यमातून मौल्यवान वस्तूंना सुरक्षा प्रदान करता येते. या पॉलिसीमुळे बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले दागिने तसंच इतर मौल्यवान वस्तूंना विमा संरक्षण लाभतं. अँड ऑन पॉलिसीमुळे लॉकरमधल्या महत्त्वाच्या कागदपत्रांनाही विम्याचं कवच मिळतं. ही पॉलिसी काढण्यासह नुकसान भरपाईचा दावा करण्याची प्रक्रिया अगदी सुलभ आहे. ही पॉलिसी अपघात, दरोडा, चोरी, बँकेच्या कर्मचार्‍यांनी केलेले गैरप्रकार तसंच इतर काही कारणांमुळे लॉकरमधल्या वस्तूंचं झालेलं नुकसान भरून काढते. दहशतवादी हल्ल्यामुळे झालेलं नुकसानही या पॉलिसीत समाविष्ट करण्यात आलं आहे.
 
अर्थात काही बाबी पॉलिसीतून वगळण्यात आल्या आहेत. लॉकरमध्ये न ठेवलेेले दागिने किंवा मौल्यवान वस्तू चोरीला गेल्यास नुकसानभरपाई मिळत नाही. तसंच लॉकरमधली वस्तू हरवण्याचं कोणतंही ठोस कारण नसल्यास नुकसानभरपाईचा दावा करता येत नाही. दागिन्यांचं मूल्य कमी झाल्यास भरपाई दिली जात नाही.