33 कोटी वृक्ष लागवडीचा महासंकल्प आनंद‘वना’तून !

    दिनांक :01-Jul-2019
33 नव्हे, 35 कोटी झाडे लावून विक्रम नोंदवू : मुख्यमंत्री 

 
 
 
संजय रामगिरवार
चंद्रपूर,
येथे ‘वन’ आहे आणि ‘आनंद’ही आहे आणि म्हणून राज्याच्या 33 कोटी वृक्षलागवडीच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाची सुरूवात ‘आनंदवना’तून केली गेली. बाबा आमटे यांच्या पावन स्मृतीने बहरलेले आनंदवन हीच ती एकमेव जागा या महत्वाकांक्षी उपक्रमासाठी यथायोग्य होती. आता आम्ही 33 कोटीच नव्हे, तर 35 कोटी झाडे लावून पुन्हा एकदा जागतिक विक्रम नोंदवू, असा अदम्य विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
 
वनमंत्री होताच सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने 50 कोटी वृक्ष लागवडीचा महासंकल्प जाहीर केला. अन्य शासकीय कार्यक्रमाप्रमाणेच याकडेही पाहिल्या गेले. पण द्दढसंकल्प, सातत्य, संघर्ष आणि पाठपुराव्याच्या जोरावर तसेच जनतेच्या सहकार्याने मुनगंटीवारांनी ही योजना यशस्वी केली. यंदा या योजनेचा शेवटचा टप्पा असून, 33 कोटी वृक्षलागवडीच्या या महोत्सवाचे उद्घाटन 1 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वरोडा येथील आनंदवनात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मोठ्या थाटात पार पडले.
 
प्रदुषणामुळे ऋतुमान बदलले आहे. चातकाप्रमाणे पावसाची वाट बघावी लागते. अवघ्या जगाचे तापमान वाढत आहे. यंदा महाराष्ट्रानेही प्रचंड ताप सहन केला आहे. निसर्गाचे संतुलन बिघडले असून, हे कुठेतरी थांबले पाहिजे. अन्यथा निसर्ग बदला घेणारच. वनांचा नाश झाला, तर महाराष्ट्राचेही वाळवंट होईल,अशी साधार भीती फडणवीस यांनी व्यक्त केली. 
 
 
केवळ मोठमोठ्या इमारती बांधून देश मोठा होत नसतो. तर वनसंपदा, जलसंपदा, भूसंपदा राष्ट्राला मोठे करते. या सार्‍यांचे संवर्धन आपल्याला करायचे आहे. त्यासाठी मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करून आम्ही एक अ‍ॅप विकसित करण्याच्या विचारात आहोत. प्रत्येक नागरिकाला त्याच्या दैनंदिन व्यवहारातून किती कॉर्बन उत्सर्जित करतो, याची नोंद या अ‍ॅपच्या माध्यमातून ठेवता येईल आणि त्याने निसर्गाचा किती विनाश केला आणि त्याप्रमाणात त्याला निसर्गाचे संवर्धन करायला काय काय करावे लागेल, हेही अ‍ॅप सांगेल. त्याप्रमाणे ज्यांनी प्रामाणिकपणे सृष्टीच्या संवर्धनासाठी उपाय योजले, पर्यावरणाचा विकास केला, त्याला महाराष्ट्र शासन पुरस्कृत करेल, अशी ही योजना आहे. ती लवकरच पूर्णत्वास येईल, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
 
याप्रसंगी 33 कोटी वृक्षलागवडच्या संदेशाचे विशेष डाक आवरण प्रकाशित करण्यात आले. तत्पूर्वी, मुखमंत्री व वनमंत्र्यांनी आनंदवनात वृक्षारोपण केले. कार्यक्रमाचे संचालन मानसी सोनटक्के यांनी, तर आभार प्रदर्शन प्रधान मुख्य वनसंरक्षक उमेश अग्रवाल यांनी केले.
 
राष्ट्रीय महामार्गावर 125 कोटी वृक्ष लावू नितीन गडकरी 
50 कोटी वृक्षलागवडीची घोषणा मुनगंटीवार यांनी केेली, तेव्हा या योजनेच्या यशाबाबत शंका होती. पण त्यांनी अतिशय उत्तम कार्य करीत, ‘लिम्का बुक रेकॉर्ड’ला दखल घेण्यास भाग पाडले. भारताच्या कानाकोपर्‍यात असे कार्य होणे अपेक्षित आहे. मुनगंटीवारांच्या या 50 कोटी वृक्ष लागवडीच्या योजनेतून प्रेरणा घेऊन आम्हीही राष्ट्रीय महामार्गावर 125 कोटी वृक्षांची लागवड करणार आहोत, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. त्यांनी चित्रफितीतून 33 कोटी वृक्ष लागवडीच्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या तसेच मुनगंटीवारांचे तोंडभरून कौतुकही केले.