मोदींच्या मुत्सद्दीपणाचे यश!

    दिनांक :01-Jul-2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची जपानमधील ओसाका शहरात झालेली भेट, दोन देशांतील संबंध आणि मैत्री आणखीन दृढ करणारी ठरणार आहे. या भेटीची पार्श्वभूमी तणावपूर्ण वातावरणाची असली, तरी या दोन महाशक्तीच्या नेत्यांची भेट अतिशय सौहार्दपूर्ण तसेच मैत्रीपूर्ण वातावरणात झाली. अमेरिका गेल्या अनेक दशकांपासून महाशक्ती आहे. भारताची, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून महाशक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. त्यामुळे ही भेट फक्त नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील नव्हती, तर प्रस्थापित आणि प्रस्तावित महाशक्तींच्या नेत्यांमधील भेट होती.
इराणसोबतच्या अमेरिकेच्या संबंधात तणाव निर्माण झाला असताना आणि या दोन देशांत कधीही युद्धाला तोंड फुटेल अशी परिस्थिती निर्माण झाली असताना, जपानमधील ओसाका येथे जी-20 देशांच्या नेत्यांची शिखर परिषद झाली. या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले असताना त्यांच्या, डोनाल्ड ट्रम्प आणि अन्य देशांच्या प्रमुखांच्या भेटी झाल्या. कोणत्याही शिखर परिषदेची उपलब्धी ही त्यांच्या अधिकृत कामकाजात आणि बैठकीनंतर पारित ठरावात असली, तरी शिखर परिषदेव्यतिरिक्त राष्ट्रप्रमुखांच्या औपचारिक भेटीव्यतिरिक्त अनेकवेळा ज्या अनौपचारिक भेटी होतात, त्यातून खूप काही साधले जाते.
जी-20 देशांच्या शिखर परिषदेला जाताना भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधात खूप तणाव नसला, तरी संबंध सुरळीतही नव्हते. अमेरिकेने आपल्या व्यापाराच्या प्राधान्यक्रमातील देशांच्या यादीतून (जीएसपी) भारताला हटवले होते; तर याला प्रत्युत्तर म्हणून भारताने अमेरिकेतून भारतात आयात होणार्‍या डाळी, बदाम आणि अक्रोड यावरील आयात शुल्कात वाढ केली होती. यामुळे दोन देशांतील संबंधात सहजपणा नसणे स्वाभाविक होते. मोदींची ही भूमिका भारताचा करारीपणा दाखवणारी आणि जशास तसे उत्तर देणारी होती. यातून भारताने अमेरिकेचाही अपवाद केला नाही.
 
 

 
 
विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी जी-20 देशांच्या शिखर परिषदेच्या आधी, अमेरिकन वस्तूंवरील वाढीव आयात कर आम्हाला मान्य नाही, अशी धमकी भारताला दिली होती. त्यामुळे ट्रम्प आणि मोदी यांची भेट कशी आणि कोणत्या वातावरणात होते, याबाबत दोन्ही देशांच्या मुत्सद्यांना चिंता वाटणे स्वाभाविक होते. पण, मोदी अमेरिकेच्या धमकीला बळी पडले नाहीत. कुणाच्याही धमकीला बळी पडणे मोदींच्या स्वभावातच नाही. उलट, या भेटीच्या आधी डोनाल्ड ट्रम्प नरमले आणि त्यांनी आपल्या भूमिकेत आश्चर्यकारक बदल केला. कारण, जागतिक राजकारणातील मोदींचे बदलते स्थान आणि महत्त्व त्यांच्याही लक्षात आले होते. त्यामुळे ट्रम्प यांनी मोदी यांचा उल्लेख ‘मित्र’ असा करत, लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. भारत आणि अमेरिका आज जेवढे जवळ आले, तेवढे याआधी कधीच आले नव्हते, असे ट्रम्प म्हणाले. यातून मोदींचा आंतरराष्ट्रीय राजकारणातील मुत्सद्दीपणा लक्षात येतो. देशांतर्गत राजकारणात मोदींना अनेक शत्रू असले, तरी आंतरराष्ट्रीय राजकारणात त्यांच्या मित्रांची संख्या कमी नाही, हे यातून दिसून येते. मोदींच्या परदेश दौर्‍यांवर तसेच त्यावर होणार्‍या खर्चावर आक्षेप घेणार्‍यांच्या आता लक्षात आले असेल की, मोदींचे हे दौरे पर्यटनासाठी नाही, तर भारताचे जगातील स्थान उंचावण्यासाठी होते. अन्यथा अमेरिकेसारख्या महाशक्तीच्या अध्यक्षाने भारताला आपला मित्र मानण्यासाठी आपली भूमिका लवचीक केली नसती.
ट्रम्प यांनी अनेक वेळा चर्चेत पॉझिटिव्ह (सकारात्मक) शब्दांचा वापर केला. डोनाल्ड ट्रम्प आणि मोदी यांनी आपल्या भेटीत दोन देशांतील व्यापारी संबंधांचे मुद्दे अतिशय आग्रहाने मांडले. आपापल्या देशांचे हितसंबंध जपण्यात कुणीही मागे नव्हते. दोन देशांत व्यापारासोबत संरक्षण, फाईव्ह-जी आणि इराणच्या मुद्यावरही चर्चा झाली. विशेष म्हणजे व्यापारसंबंधातील दोन देशांतील तणावपूर्ण मुद्दे चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यावर सहमती दर्शवताना, दोन देशांतील वाणिज्य मंत्र्यांची लवकरच बैठक आयोजित करण्यावर मतैक्य झाले.
फाईव्ह-जीवर या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. चीनच्या हुवेई कंपनीवर बंदी घालण्याची मागणी करताना ट्रम्प यांनी, भारताने अमेरिकी तंत्रज्ञान वापरण्याची मागणी केली. फाईव्ह-जीचा वापर भारतही करत असून ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाला गती देण्यासाठी याचा वापर करण्याची भारताची भूमिका असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले. एकेकाळी जगात अमेरिका आणि रशिया या दोनच महाशक्ती असताना अमेरिकेचा कल हा पाकिस्तानकडे होता, रशियाला भारताचा नैसर्गिक मित्र मानले जात होते. आज परिस्थिती बदलली आहे, रशियासोबतचे भारताचे संबंध आजही तेवढेच चांगले आहेत. अमेरिकेने पाकिस्तानला वार्‍यावर सोडले नसले, तरी भारतासोबतची मैत्री तोडण्याची अमेरिकेची तयारी नाही, हे ट्रम्प यांच्या ताज्या भूमिकेवरून दिसून येत आहे, याचे संपूर्ण श्रेय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला द्यावे लागेल! याआधी आपल्या पहिल्या कार्यकाळात मोदी यांनी ‘ब्रिक्स’ देशांच्या बैठकीत मंदी, जलवायू परिवर्तन आणि दहशतवाद या तीन गंभीर आजारांकडे लक्ष वेधले होते. या समस्यांचा सामना करताना मोदींनी पाच सूत्री कार्यक्रमही दिला होता.
विशेष म्हणजे मोदी यांनी इराणसोबतच्या अमेरिकेच्या तणावाचा आणि त्याचा भारताच्या हितावर होणार्‍या परिणामाकडे ट्रम्प यांचे लक्ष वेधले. भारताच्या एकूण गरजेपैकी 11 टक्के तेल भारत इराणकडून घेत होता, पण अमेरिकेच्या दबावामुळे तेही घेणे बंद केले. इराणसोबतच्या अमेरिकेच्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे भारताचे हितसबंध धोक्यात आले आहेत, कारण इराणमध्ये 80 लाख भारतीय राहतात, असे मोदी म्हणाले.अमेरिकेसारख्या महाशक्तीच्या नेत्याला मोदी यांनी भारताचे हितसंबंध जपण्यासाठी जे खडेबोल सुनावले, त्याबद्दल त्यांचे कौतुकच केले पाहिजे. मोदींच्या ऐवजी दुसर्‍या कमकुवत नेत्याकडे भारताचे नेतृत्व असते, तर अमेरिकेला सुनावण्याची आणि आपल्या अटींवर झुकवण्याची भारताची हिंमत झाली नसती, याबद्दल कोणतीही शंका वाटत नाही. ‘मोदी हैं तो मुमकीन हैं!’ फक्त देशांतर्गत मुद्यावरच नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही शक्य असल्याचे दिसून येत आहे. मोदींच्या नेतृत्वात देश सुरक्षित राहील तसेच देश प्रगतिपथावर जाईल, असा जो विश्वास देशवासीयांच्या मनात आहे, तो उगीच नाही. मोदींनी आपले नेतृत्व कणखर असल्याचे तसेच आपले नाणे खणखणीत असल्याचे याआधीही आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेकदा सिद्ध केले आहे. मोदींमुळेच पाकिस्तान दबून आहे, भारताने एक नाही दोन ‘सर्जिकल स्ट्राईक’ करूनही पाकिस्तानची भारताविरुद्ध कोणतीही कारवाई करण्याची हिंमत झाली नाही, हे मोदींच्या नेतृत्वाचे यश आहे. त्यामुळेच तर भारतासोबतचे आमचे संबंध आज जेवढे जवळचे आहेत, तेवढे याआधी कधीच नव्हते, याचा दाखला देत, मोदींना आपले मित्र म्हणण्याची वेळ अमेरिकेसारख्या महाशक्तीच्या अध्यक्षावर आली आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाचे गेल्या 70 वर्षांतील हे सर्वात मोठे यश म्हणावे लागेल! आम्ही आपणहून कुणाच्या वाटेला जाणार नाही, मात्र कुणी आम्हाला छेडले तर त्याला सोडणारही नाही, असा संदेश भारताने यानिमित्ताने दिला आहे. राष्ट्रीय पातळीवरील ‘सबका साथ सबका विकास’ आणि ‘सबका विश्वास’ हे आता भारताच्या परराष्ट्र धोरणाचे सूत्र झाले, तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही...