सुब्रह्मण्यम स्वामींविरोधात 39 एफआयआर दाखल

    दिनांक :10-Jul-2019
राहुल गांधी यांच्यावर अंमली पदार्थांच्या सेवनाच्या केलेल्या विधानावरून भाजपाचे राज्यसभेचे सदस्य डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यांच्याविरोधात राजस्थानमध्ये 20 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. तसेच या याचिकांनंतर मंगळवारी निरनिराळ्या पोलीस स्थानकांत 39 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे एफआयआर दाखल केले आहेत.
 
 
सोमवारी प्रदेश काँग्रेस समितीचे महासचिव सुशील शर्मा यांनी स्वामींविरोधात याचिका दाखल केली आहे. स्वामी यांनी कथितरित्या राहुल गांधी हे अंमली पदार्थांचे सेवन करतात असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वक्तव्याविरोधात नाराजी व्यक्त केली. तसेच युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भादंविच्या 504, 505 आणि 511 या कलमांतर्गत खटला दाखल केला आहे. दरम्यान, सुब्रह्मण्यम स्वामी यांनी सार्वजनिकरित्या राहुल गांधींची माफी मागावी अशी मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.
राहुल गांधी यांच्याविरोधात स्वामी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आपल्या भावना दुखावल्या असल्याचे याचिकाकर्त्यांकडून सांगण्यात आले. तसेच त्यांचे हे वक्तव्य मानहानी करणारे असल्याचे मानले पाहिजे, असेही कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. तसेच शर्मा यांनी स्वामी यांच्याविरोधात भादंविच्या 357 (3) नुसार 1 कोटी रूपयांचा दावा ठोकला आहे.
डॉ. स्वामी यांनी जाणूनबुजून काँग्रेसची प्रतिमा मलिन करून राजकीय लाभ मिळवण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य केले आहे. स्वामी यांनी राहुल गांधीची माफी मागितली पाहिजे, असेही शर्मा यांनी सांगितले.