चंद्रपुरात नवजात बालकाची बेकायदेशीर खरेदी

    दिनांक :10-Jul-2019
जिल्हा सामान्य रूग्णालयात घडला प्रकार 

 
चंद्रपूर, 
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात एका अज्ञात महिलेने बाळाच्या जैविक मातेला फूस लावून व तिच्या सामाजिक परिस्थितीचा फायदा घेत बाळ हस्तगत करण्याच्या प्रयत्न केला. शिवाय बाळाचे सर्व कागदपत्र स्वतःच्या नावाने तयार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. जबरीने कुमारी मातेसह तिच्या बाळाला स्वतःच्या घरी नेले. या प्रकरणाची माहिती मिळताच जिल्हा बाल संरक्षण कक्षाने या बालक खरेदी प्रकरणावर कारवाई केली. त्या नवजात बाळाला ताब्यात घेऊन प्राथमिक बालगृहात दाखल केले आहे.
 
कुमारी मातेच्या सांगण्यावरून चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात एका अज्ञात महिला कुमारी मातेसह तिच्या बाळाला बेकायदेशीररित्या स्वतःच्या घरी घेऊन गेली. यासंदर्भातील गोपनीय माहिती मिळताच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर.. एम. टेटे, जिल्हा परिविक्षा अधिकारी रमेश दडमल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, संरक्षण अधिकारी प्रीती उंदिरवाडे, कार्यकर्त्या अंजूबाला काळे यांनी अज्ञात महिलेच्या घरी जाऊन बाळाला ताब्यात घेतले.
 
विशेष म्हणजे, रामनगर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक विठ्ठल मोरे, पोलीस नायक सुरेश कसारे यांनी चौकशी केली असता त्या बाळाचे डिस्चार्ज कार्ड व इतर मेडिकल दस्तऐवजाची पडताळणी केली असता, त्यावर बाळाच्या जैविक मातेच्या नावाऐवजी अज्ञात महिलेच्या नावाची नोंद आढळून आली. ही नोंद जिल्हा सामान्य रुग्णालय येथून झाल्याची बाब समोर आली. अज्ञात महिलेने बाळाच्या जैविक मातेला फूस लावून व तिच्या सामाजिक परिस्थितीचा फायदा घेऊन बाळ हस्तगत करण्याच्या उद्देशाने बाळाचे सर्व कागदपत्र स्वतःच्या नावाने तयार केले, असे उघडकीस आले.
 
आता त्या बाळाला जिल्हा बाल कल्याण समितीच्या आदेशान्वये प्राथमिक बालगृह चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणावर जिल्हा बालकल्याण समितीमार्फत कारवाई सुरू आहे. यावेळी जिल्हा बाल संरक्षण कक्षातील समुपदेशिका प्रिया पिंपळशेंडे, सामाजिक कार्यकर्ती प्रतिभा मडावी उपस्थित होत्या.
प्रकरण चौकशीत : बहादूरे
सामान्य रूग्णालयातून एका नवजात बालकाची बेकायदेशीररीत्या खरेदी प्रकरण उजेडात आले असून, याप्रकरणाची सध्या सखोल चौकशी केली जात आहे. चौकशीअंती दोषींवर कारवाई करू, अशी माहिती शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार सी. व्ही. बहादूरे यांनी तभाला दिली.