चोरलेले मोबाईल बांगलादेश-नेपाळला कुरिअर करताना दोघांना अटक

    दिनांक :10-Jul-2019
मुंबई,
रेल्वे आणि बसमधून चोरलेल्या प्रवाशांच्या मोबाईलची विक्री थेट बांगलादेश आणि नेपाळमध्ये होत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. चोरीचे मोबाईल फोन विकत घेऊन ते देशाबाहेर पाठवणाऱ्या टोळीच्या म्होरक्यासह दोन जणांना मुंबईतील विलेपार्ले पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या दोघांकडून 57 मोबाईल फोन हस्तगत केले असून ते सर्व चोरीचे असल्याचं तपासात उघडकीस आलं आहे. चोरीचे मोबाईल देशाबाहेर पाठवणाऱ्या टोळी पश्चिम बंगालपासून बांगलादेश पर्यंत सक्रिय असून एका टोळीत अनेक जण काम करत असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे.
 
 
मुंबईतील उपनगरीय लोकल ट्रेन आणि रस्त्यांवर दररोज सरासरी 150 मोबाईल फोन चोरीला जात असल्याच्या घटनांची नोंद विविध पोलिस ठाण्यात दाखल होत आहे. प्रवाशांच्या हातावर फटका मारुन मोबाईल फोन चोरी करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस लक्षणीय वाढ झाली आहे. अनेकवेळा तर प्रवाशांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत.
यापूर्वी चोरलेले मोबाईल फोन मुंबई किंवा बाहेरील मोबाईल दुकानदार, मोबाईल रिपेरिंग करणारे सहज विकत घेत होते. मात्र पोलिसांनी चोरीचे मोबाईल विकत घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केल्यामुळे चोरीचा मोबाईल विकताना चोरांची पंचाईत व्हायला लागली. मात्र, आता हेच चोरीचे मोबईल फोन थेट बाहेरच्या देशाच्या जाऊ लागल्यामुळे मोबाईल चोरीच्या धंदा तेजीत सुरु झाला.
मुंबई तसेच आसपासच्या शहरांमध्ये चोरीचे मोबाईल फोन कवडीमोल भावात घेणाऱ्या टोळ्या निर्माण झाल्या असून या टोळ्यांचे जाळे पश्चिम बंगाल ते बांग्लादेश आणि नेपाळपर्यंत जाऊन पोहचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विलेपार्ले पोलिसांनी अशाच एका टोळीच्या म्होरक्यासह दोन जणांना विलेपार्ले येथून अटक केली आहे. जाहिद अहमद खान आणि मोहम्मद हसन शेख असं अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. जाहिद हा या टोळीचा म्होरक्या असून त्याच्या टोळीत जवळपास 20 जण काम करतात. या टोळीचे इतर सदस्य मुंबईसह देशात तसेच देशाबाहेर काम करतात. विलेपार्ले पोलिसांनी जाहिद आणि त्याच्या साथीदाराला शुक्रवारी कोलडोंगरी भागातील एका कुरिअर कंपनीजवळून अटक केली आहे.
या धंद्यामध्ये मोबाईल चोर आणि कुरिअर करणाऱ्या मुख्य चोराचा कधी संबंध येत नाही. बस किंवा रेल्वेमध्ये रस्त्यावर चोरी करणाऱ्या छोट्या चोराला सांकेतिक भाषेत 'मशीन' म्हणतात, तर मोबाईलला कौआ म्हणतात. हे मशीन मध्यस्थाद्वारे मुख्य चोराकडे जातात. तिथूनच पुढे हा मोबाईल कुरिअर केला जातो.
जाहिद खान हा या टोळीचा म्होरक्या. तो आणि त्याचा साथीदार 57 महागड्या मोबाईलचे पार्सल घेऊन ते पश्चिम बंगालला कुरिअर करण्यासाठी आलेले असताना त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. चोरीचे मोबाईल नवीन मोबाईलच्या अर्ध्या किमतीत बांगलादेश आणि नेपाळमध्ये विकले जात असल्याची माहिती आहे.
विलेपार्ले पोलिसांनी दोघांकडून हस्तगत केलेल्या 57 मोबाईलची किंमत 8 लाख 89 हजार रुपयांच्या घरात असल्याचं पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या इतर सहकाऱ्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे.