राष्ट्रीयकृत बँकांची पीककर्ज वाटपात शेतकऱ्यांप्रती उदासिनता

    दिनांक :10-Jul-2019

भंडारा,
शासन शेतक-यांच्या पाठीशी असून त्यांच्या उत्थानासाठी नवनविन योजना कार्यान्वित करीत आहे. शेती करण्यासाठी बँकांच्या माध्यमातुन शेतक-यांना कर्ज पुरवठा केला जातो. यासाठी हंगामानुसार बँकाना लक्ष्यांक दिले जाते. जिल्हा बँक वगळता राष्ट्रीय, ग्रामीण, खाजगी बँका दिलेले उद्दीष्ट गाठत नाही. गत तीन महिन्याच्या कालावधीत स्टेट बँक ऑफ इंडियाने दिलेल्या उद्दीष्टाच्या केवळ नऊ टक्के पीककर्ज वाटप केले आहे. या आकडेवारीवरून पुन्हा एकदा या बँकेची शेतक-यांप्रती उदासिनता समोर आली आहे. 
 
 
कोणताही व्यवसाय म्हटलं की त्याला भांडवलाची गरज असते. हे भांडवल बँकांच्या माध्यमातून उपलब्ध केले जाते. शेती हा एक व्यवसाय आहे. यासाठी शासन बँकांच्या माध्यमातून शेतकèयांना अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देते. हंगामानुसार जिल्हा, राष्ट्रीयकृत, ग्रामीण आणि खाजगी बँकांना उद्दीष्ट दिले जाते. यंदाच्या खरीप हंगामाकरिता स्टेट बँक ऑफ इंडियाला 33 कोटी पीककर्ज वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. 1 एप्रिल पासून आजपर्यंत बँकेने केवळ उद्दीष्टाच्या नऊ टक्केच पीककर्ज वाटप केले. यावरून सदर बँकेची शेतक-यांप्रती उदासिनता दिसून येते. जिल्हा बँकेने दिलेल्या उद्दीष्टाच्या 87 टक्के कर्ज वाटप केले आहे.
 
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बँक पीक कर्ज वाटपात अग्रेसर आहे. जिल्हा बँकेने 48 हजार पेक्षा अधिक शेतकèयांना 217 कोटी 95 लाख 48 हजार रुपये कर्जाचे आतापर्यंत वाटप केले आहे. तर राष्ट्रीयकृत बँकांनी 3135 शेतक-यांना 2 कोटी 38 लाख रुपयाचे पीककर्ज वाटप केले असून याची टक्केवारी 20.70 आहे. ग्रामीण बँकेनी 1980 शेतक-यांना 14 कोटी 7 लाख रुपये कर्ज वाटप केले आहे. खाजगी बँकांनी 379 शेतक-यांना 53 कोटी 30 लाख रुपयाचे कर्ज वाटप केले. भंडारा जिल्ह्याला 414 कोटी 50 लाख रुपये पिककर्ज वाटप करण्याचे उद्दीष्ट आहे. यापैकी आतापर्यंत 157 बँक शाखांच्या माध्यमातून 53 हजार 646 शेतक-यांना 261 कोटी 16 लाख 32 हजार रुपयाचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. उद्दीष्टाच्या 63 टक्के पीककर्ज वाटप झाले आहे. पीककर्ज घेण्याची मुदत 31 जुलै पर्यंत आहे.
 
राष्ट्रीयकृत बँकांना जिल्हाधिका-यांच्या मार्फत वारंवार सुचना देऊनही त्यांनी पीककर्ज वाटपाची गती अद्यापही वाढविली नाही. परिणामी आज जिल्ह्यातील शेकडो शेतक-यांना पीककर्जापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.