नवविवाहितेबरोबर अघोरी प्रकार, गुप्तधनासाठी ठेवले ५० दिवस उपाशी

    दिनांक :10-Jul-2019
चंद्रपूर,
गुप्तधनाच्या लोभापायी पत्नीचा अमानवीय छळ करून अघोरी पुजा करणार्‍या मांत्रिकासह पतीस शेगाव पोलिसांनी बुधवारी अटक केली. याप्रकरणातील पीडित नववाहितेची सासू-सासरा जळगावला असून त्यांनाही लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती शेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार एस. पी. बोरकुटे यांनी तभाला दिली. चिमूर तालुक्यातील कारेकर कुटुंबातून अंधश्रद्धेचा हा प्रकार समोर आला आहे. सतत 50 दिवस उपासमार, मारझोड अशा प्रकारचे अघोरी प्रकार नवविवाहितेबरोबर केल्याचेही समोर आले आहे. 
 
 
याप्रकरणी पती समीर कारेकर, मांत्रिक अरूण दहेकर यांना अटक केली असून, सासू विमल कारेकर व सासरा गुणवंत कारेकर यांच्यासह चौघांवर शेगाव पोलिसांनी भादंवी 498 आरोपींवर जादूटोणाविरोधी कायदा 2013 मधील कलम कलम 2(1), 4, 5, 6, 3 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाची तक्रार अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यसंघटक हरीभाऊ पाथोडे, नवविवाहिता सविता व व वडील मुकेश वाघाडे यांनी मंगळवारी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली होती.
 
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील मुकेश वाघाडे यांची मुलगी सविता हिचा विवाह चिमूर तालुक्यातील सावरी बिडकर येथील समीर गुणवंत कारेकार याच्याशी 19 ऑगस्ट 2018 रोजी झाला. सासरी गेली त्याच दिवशी सासू विमलबाई अंगणात घसरून पडल्या. तेव्हापासून सविताच्या माथी सासरच्या लोकांनी अपशकुनी असा शिक्का मारल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
 
समीर, त्याचे वडील गुणवंत कारेकार आणि आई विमल यांनी सविताला पहिल्याच रात्री तीन वाजता दर्गा स्वच्छ करायला लावला. त्यानंतर याच दर्गातील एका कासवाची अंघोळ आणि त्याचीही पूजा -अर्चा करायला सांगण्यात आले. सासरकडील काही विधी असेल म्हणून कासव आणि त्याच्यासोबत चांदीच्या नागाची पूजा अर्चा केली. त्यांच्याच सांगण्यावरून तिला एक ते दीड किलो मुरमुरे खावू घातले. त्याचवेळी समीरच्या अंगात ताजुद्दीन बाबा आला. तो मारझोड करेल. ते मुकाट्याने सहन करण्याची तंबीही सविताला सासर्‍याच्या लोकांनी दिली होती, असेही तक्रारीत नमूद आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत तिला पाणी, चहा, अन्न काहीच दिले नाही. त्यानंतरच तिला जेवायला मिळाले. दुसर्‍या दिवशीही हा प्रकार सासरच्या मंडळींनी करायला सांगितला. तिची तिथून सुटका होईपर्यंत सतत पन्नास दिवस रात्री तीन ते दुपारी दोन वाजेपर्यंत हा धक्कादायक प्रकार सुरू असल्याचे तक्रारीत अंनिस व पीडितेसह वडिलांनी म्हटले आहे.
 
गुजगाव येथील अरुण दहीकर महाराज या विधी करण्यासाठी यायचा. तो निबांला सात काटे टोचून सविताच्या अंगावरून उतरवीत असे. या काळात तिला मारहाण आणि चटके देणे नित्याचेच झाले होते. या विधीमुळे नागोबा प्रसन्न होवून गुप्तधनवर येईल, असा समज कुरेकार कुटुंबियांचा झाला होता. असेही अंनिसचे राज्यसंघटक हरिभाऊ पाथोडे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या काळात पीडितेचा वडिलांशी संपर्कच तोडण्यात आला. तिच्याकडील भ्रमणध्वनी हिसकावण्यात आला होता. वडिलांनी भेटीसाठी येण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना सासरकडून मज्जाव करण्यात आला होता. नवरात्रीला नेण्यासाठी नवविवाहितेचे वडिल आले असता, हा अघोरी प्रकार समोर आला. त्यानंतर न्यायासाठी त्यांनी अनेकांचे उंबरठे झिजवले. वनविभागाने याआधीच कारेकर यांच्या घरातील कासव जप्त केला होता.