समाजविघातक तत्त्वांना वेळीच पायबंद घाला!

    दिनांक :10-Jul-2019
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपाप्रणीत रालोआ सरकारच्या पहिल्या काळात मोदी सरकारला बदनाम करण्याचे पद्धतशीर प्रयत्न करण्यात आले. पण, मोदी सरकारने ते निष्फळ ठरविले. सातत्याने सत्ता उपभोगायची सवय झालेले सत्तेबाहेर फेकले गेल्यानंतर अस्वस्थ होते. मोदी सरकारला बदनाम करण्याची एकही संधी ते सोडत नव्हते. देशाच्या कुठल्याही भागातील एखाद्या कोपर्‍यात साधे खुट्ट वाजले, तरी मोदी सरकारला जबाबदार धरून एकच हल्लकल्लोळ केला जायचा. मोदी सरकारच्या काळात देशात सहिष्णुता संपुष्टात आल्याचा कांगावाही करण्यात आला. मोदी सरकारला बदनाम करून सत्ताच्युत करण्याचे सर्व प्रयत्न विफल झाल्यानंतर, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकार 2014 पेक्षाही जास्त मताधिक्याने पुन्हा सत्तेत आले. आता पुन्हा एकदा मोदी सरकारला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ते यशस्वी ठरणार नाहीत हा भाग वेगळा असला, तरी समाजात फूट पाडली जाईल, मनामनात विष कालवले जाईल आणि त्याचे परिणाम देशाला अनंत काळ भोगावे लागतील, यात शंका नाही. हा मुद्दा लक्षात घेतला तर मोदी सरकारने अशा समाजविघातक तत्त्वांना वेळीच पायबंद घालणे आवश्यक आहे.
 
 
2014 मध्ये मोदींनी ‘सब का साथ सब का विकास’ असा नारा दिला होता. पण, यंदा त्यात ‘विश्वास’ हा शब्द जोडला आहे. निवडून आल्यानंतर, पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतरची मोदींची भाषणं आपण ऐकलीत, तर मोदी देशाला कशी दिशा देणार हे स्पष्ट होते. जात-पात-धर्म-पंथ-भाषा अशा कुठल्याही आधाराने कुणावरही अन्याय होता कामा नये, भेदाभेद होता कामा नये, ही मोदींच्या कारभाराची दिशा असणार आहे आणि त्यासाठी ते प्रामाणिक प्रयत्नही करीत आहेत. असे असतानाही जर कुणी देशात पुन्हा असहिष्णुता येत असल्याची भावना व्यक्त करीत असेल, तर तो कटकारस्थानाचा भाग मानला पाहिजे. सत्तेबाहेर गेलेली कॉंग्रेस जाणीवपूर्वक असा प्रयत्न तर करीत नाही ना, अशी शंका घ्यायला वाव निर्माण झाला आहे. आपल्या पक्षातील जे लोक काहीबाही बोलतात त्यांना मोदींनी फटकारे हाणले आहेत, स्पष्ट शब्दांत समजही दिली आहे. आपल्याला सर्वसमावेशक विकास करायचा आहे, देशाला प्रगतिपथावर न्यायचे आहे, हे मोदींनी एकदा नव्हे, अनेकदा स्पष्ट केले आहे. असे असताना मोदी यांच्यावर विश्वास तर ठेवायला हवा ना! पण, काहीही करून मोदींना सत्तेबाहेर हाकलण्यासाठी आसुसलेल्यांनी आतापासूनच कटकारस्थानं करायला सुरुवात केली आहे. मात्र, देशातील जनतेने प्रचंड बहुमताने निवडून दिलेल्या सरकारच्या केसालाही धक्का लावण्याची क्षमता या ढोंग्यांमध्ये नाही, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे.
 
आपल्या देशात लोकशाही आहे. लोकशाहीत अभिव्यक्तिस्वातंत्र्यही आहे. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहेे. लोकशाहीत सत्ताधारी पक्षाएवढेच महत्त्व विरोधी पक्षालाही आहे. त्यामुळे सरकारच्या विरोधात मत मांडण्याचाही अधिकार नागरिकांना मिळाला आहे. सरकारविरोधी मत मांडले तर कुणी देशद्रोही ठरू शकत नाही. सरकारलाही ही बाब मान्य आहे. पण, काही लोक विनाकारण गळे काढून रडत आहेत. स्वत:ला सुधारणावादी समजणार्‍या अभिनेत्री शबाना आझमी सरकारविरोधात बोलत आहेत, तो त्यांचा अधिकार आहे. सरकारविरोधात बोलल्या म्हणून त्यांना कुणीही देशद्रोही म्हटलेले नाही. पण, समाजात गैरसमज निर्माण करण्यासाठी त्या वेगळेच वातावरण तयार करीत आहेत. जी व्यक्ती देशहिताला बाधा पोचवेल तिलाच देशद्रोही ठरविले जाते. देशद्रोह होईल असे काही कृत्य शबाना आझमी यांच्याकडून घडले नसेल, तर कोण त्यांना देशद्रोही म्हणेल? पण, पडद्यावरील अभिनयात पारंगत असलेल्या शबाना आझमी सरकारला बदनाम करण्यासाठीही उत्तम अभिनय करताना दिसत आहेत. या शबानाबाईंना त्यांची जागा वेळीच दाखवून देण्याची गरज आहे. केंद्रात निवडून आलेले मोदी सरकार हे या देशातील जनतेने प्रचंड बहुमताने निवडून दिले आहे. जर हे सरकार असहिष्णू असते, तर जनतेने पुन्हा निवडून दिले असते काय? मुळीच नाही. पाच वर्षे या मंडळींनी मोठ्या मुश्किलीने सत्तेबाहेर काढलीत. आता त्यांची सहनशक्ती संपलेली आहे. सत्ता राबवताना मनमानी करण्याची सवय असलेली मंडळी सत्तेबाहेर अस्वस्थ आहेत. शबानाबाईंना सगळीकडे असहिष्णुताच कशी काय दिसते, त्यांनी कोणता चष्मा डोळ्यांवर लावला आहे, हे तपासून पाहण्याची वेळ आली आहे. ज्या जनतेने मोदी सरकारला प्रचंड मोठा कौल दिला, त्या जनतेचा शबानाबाई अपमान करीत आहेत, हेही लक्षात घेतले पाहिजे.
मध्यंतरी झारखंडमध्ये एक घटना घडली. तबरेज अन्सारी नावाच्या मुस्लिम तरुणाला जमावाने बेदम मारहाण केली. पण, ही मारहाण का केली, हे लक्षात न घेता त्याला हिरवा रंग देण्यात आला. तबरेजने मोटारसायकल चोरली होती. त्यामुळे जमावाने त्याला बांधून ठेवत मारले. तो कोणत्या धर्माचा आहे याच्याशी काही देणेघेणे नसलेल्या जमावाने तो चोर आहे म्हणून त्याला मारले. पण, तमाम स्वयंघोषित पुरोगाम्यांनी, मोदीविरोधी स्वार्थांध मंडळींनी त्याला झालेल्या मारहाणीला जातीयवादी रंग दिला. ज्यांनी कायम तुष्टीकरणाचे राजकारण केले, त्यांनी हे प्रकरण तापवण्याचा आणि स्वत:ची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न चालविला आहे.
 
झारखंडमध्ये तबरेजच्या मुद्यावरून अल्पसंख्यक समुदायाने मोठे आंदोलनही केले, अजूनही सुरू आहे. काही दिवसांपूर्वी आंदोलकांनी एक बस अडविली आणि त्या बसमधून एक आवाज आला की आम्ही मुस्लिम आहोत. झाले, मुस्लिमांना खाली उतरवून इतरांच्या बाबतीत कठोर भूमिका घेतली गेली. अल्पसंख्यक समाज असा बदल्याच्या भावनेने वागणार असेल, तर दोन समुदायांत कधीही सामंजस्य निर्माण होणार नाही. स्वत:च्या संकुचित स्वार्थासाठी कुणी आपली माथी भडकवत आहेत, हे जर अल्पसंख्यक समुदाय समजून घेणार नसेल, तर समस्येवर तोडगा कधीच निघणार नाही. मूळ घटना काय होती, कोणत्या कारणाने तबरेजला मारण्यात आले, ही बाब सोईस्करपणे विसरत त्या घटनेला जातीय रंग देण्यात मोदीविरोधक यशस्वी ठरले आहेत. मोदविरोधकांचे हे यश देशाला कुठे घेऊन जाईल, हे वेगळे सांगायला नको.
मध्यंतरी दिल्लीच्या चांदणी चौक भागात एका मंदिरातील मूर्तींची तोडफोड करण्यात आली. मुस्लिमांच्या चिथावणीखोर टोळक्याने हे घृणित कृत्य केले. हिंदू राहात असलेल्या गल्लीत सशस्त्र  घालत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. ही घटना शबाना आझमी, त्यांचे पती जावेद अख्तर यांना दिसली नाही. एक अखलाख मेला तर बेंबीच्या देठापासून बोंबलणारे स्वयंघोषित पुरोगामी कुठे वाळून चोच खुपसून बसले होते? त्यांनी या घटनेचा साधा निषेधही केला नाही. याउलट, ही घटना एखाद्या मशिदीबाबत घडली असती तर केवढा गहजब झाला असता? प्रत्येक गोष्टीकडे धार्मिक चष्म्यातून पाहण्याची सवय जडलेले स्वयंघोषित पुरोगामी, निधर्मी लोक हिंदूंनाच लक्ष्य का करतात, याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने जनतेला सर्वच बाबतीत शिस्त लावण्याचे सुरू केलेले प्रयत्न या मंडळींच्या डोळ्यांत खुपताहेत आणि त्यातूनच ते बेलगाम आरोप करीत आहेत. या मंडळींचा वेळीच बंदोबस्त करायला हवा. अन्यथा, पुढला काळ कठीण आहे!