अल कायदाच्या म्होरक्याची भारताला धमकी

    दिनांक :10-Jul-2019
ओसामा बिन लादेनच्या दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या अल जवाहिरीने काश्मीरवरून पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. त्याने काश्मीरमध्ये दहशतवाद भडकावणारा संदेश जारी केला आहे. दरम्यान, त्याने ‘Don’t Forget Kashmir’ (काश्मीरला विसरू नका) या नावाने संदेश देत केवळ भारतालाच इशारा दिला नाही, तर त्याने भारतात दहशतवाद पसरवणाऱ्या दहशतवाद्यांचे आणि त्यांच्या कृत्यांचे समर्थनही केले आहे.
 
 
अल कायदाच्या मीडिया शाखेने जारी केलेल्या संदेशात दहशतवादी मुसाचेही छायाचित्र लावण्यात आले आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवणाऱ्या दहशतवाद्यांसमोर येऊन त्यांना समर्थन देणे आणि त्यांचे समर्थन घेणे हा त्यामागचा अल जवाहिरीचा हेतू असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, त्याने आपल्या संदेशात पाकिस्तानवरही टीका केल्याचे दिसत आहे.
दरम्यान, दहशतवाद्यांना त्याने जिहादी असे संबोधले आहे. तसेच काश्मीरमध्ये लढणाऱ्या जिहादींनी पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांच्या तावडीतून मुक्त झाले झाले पाहिजे. तसेच शारीया कायद्यानुसार त्यांनी आपली धोरणे तयार केली पाहिजे, असेही त्याने संदेशात म्हटले आहे. तसेच त्याने दहशतवादाला समर्थन देत त्याला प्रोत्साहन दिल्याचे समोर आले आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांच्याविरोधात लढण्यासाठी अल कायदा दहशतवाद्यांचा एक समूह तयार करण्याच्या प्रयत्न करत आहे. दरम्यान, आपल्या विचारांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे नुकसान होईल आणि भारताला उपकरणे, सैनिकांच्या कमतरतेचा सामना करावा लागेल, असेही त्याने आपल्या संदेशात म्हटले आहे.
जवाहिरीने ठार करण्यात आलेल्या झाकिर मुसाबाबत कोणतीही माहिती दिली नाही. काश्मीरमधील लढाई ही कोणताही वेगळा संघर्ष नसून संपूर्ण मुस्लीम समुदायासाठी तो जिहादचाच एक भाग आहे. आपले दहशतवादी मशीद, बाजारपेठा आणि मुस्लीम बांधव एकत्र येतात अशा काश्मीरमधील ठिकाणांना निशाणा बनवत नाही, असेही त्याने संदेशात म्हटले आहे.